या महामारीमध्ये चांगले निर्णय घेण्यासाठी डॉक्टरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे-आरोग्य मंत्री राजेश टोपे

कल्याण/प्रतिनिधी – कोविड कालावधीत सर्व डॉक्टर्सनी केलेल्या कार्याला माझा सलाम, या महामारीमध्ये चांगले निर्णय घेण्यासाठी डॉक्टरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे असे उद्गार राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काढले.  राज्यात कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकते अशी शक्यता वर्तविली जात असल्यामुळे शनिवारी रात्री आय.एम.ए. कल्याण व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बालरोग कोविड या विषयावर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या वेबिनार मध्ये ते बोलत होते.

या वेबिनार मधील ज्ञान देशात सगळ्यांना उपयोगी पडू दे, त्याच प्रमाणे वेबिनारमधील उपयुक्त टिप्स शासनाकडे ही पाठवा असेही ते पुढे म्हणाले. सध्या पोस्ट- कोविड रुग्णांत दिसून येणाऱ्या म्युकरमायकॉसिस या आजारासाठी लागणारे amphotericin हे औषध येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होईल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

या वेबिनार मध्ये डॉ. राहुल यादव- नवजात तज्ञ, कांची कामकोटी, चाइल्ड ट्रस्ट हॉस्पिटल, डॉ. तनु सिंघल- बालरोग संसर्गजन्य रोग तज्ञ, कोकिलाबेन हॉस्पिटल मुंबई तसेच डॉ. परमानंद आंदणकर- बालरोगतज्ञ सल्लागार, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे या तज्ञ डॉक्टरांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत मुलांना संभवणारा धोका लक्षात घेऊन मुलांमध्ये दिसून येणारी कोविडची लक्षणे, त्यावर करावयाच्या उपाय योजना ,कोविडग्रस्त गरोदर माता,  त्यांचे लसीकरण या विषयांबाबत उपस्थित डॉक्टरांना मोलाचे मार्गदर्शन केले.

मुलांना कोविडच्या संभाव्य लाटेचा सामना करावा लागू नये यासाठी या वेबीनारचे आयोजन केले असल्याची माहिती  आय.एम.ए कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील यांनी यावेळी दिली. कल्याण-डोंबिवलीतील सर्व वैद्यकीय संघटनांनी कोविड कालावधीत महापालिकेत फार मोलाची मदत केल्याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीतील सर्व वैद्यकीय संघटनांचे आभार मानले.

        या वेबिनार मध्ये देशभरातील सुमारे ७०० डॉक्टर्स/ बालरोगतज्ञ सहभागी झाले होते. वेबिनार यशस्वी करण्यासाठी आय.एम.ए. कल्याण चे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांच्यासह डॉ इशा पानसरे, डॉ आनंद लीटकर , डॉ गिरीश भिरुड, डॉ सोनाली पाटील, डॉ राजेश राघवराजू, डॉ राजेश्‍वर वानखेडे, डॉ.आशिष पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web