सोलापूरच्या भांगे कुटुंबाचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग राज्यात ठरलाय आदर्श मॉडेल, तीन गुंठ्यांत ७५ शेती पिके

सोलापूर/प्रतिनिधी – सध्या शेती क्षेत्रात उत्पन्न वाढवण्यासाठी विविध प्रयोग सुरू असून त्यासाठी विविध रसायनयुक्त खतांचा वापर केला जात आहे.शेतातील पालेभाज्या, फळे यांची लवकर वाढ व्हावी व त्यातून आर्थिक नफा मिळावा यासाठी शेती क्षेत्रात केमिकलयुक्त खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. शेतात नैसर्गिक पणे येणाऱ्या पालेभाज्या, फळे बाजारात दिसेनाशा झाल्या आहेत.असे असताना खैरेवाडी येथील शेतकरी मनीषा भांगे व त्यांचा मुलगा गोरक्षनाथ भांगे यांनी सेंद्रिय शेती करून अवघ्या ३ गुंठा शेतीत ७५ पिके घेऊन किमया केली आहे.त्यांच्या या शेतीत विविध प्रकारच्या पालेभाज्या,फळझाडे,औषधी वनस्पती,वनझाडे यांची लागवड करण्यात आली आहे.दररोजच्या जेवणातून केमिकलयुक्त पालेभाज्या,फळे यांच्या माध्यमातून लोकांच्या पोटात विष जात असताना मनीषा भांगे व गोरक्षनाथ भांगे या माय-लेकरांनी सेंद्रिय शेती करून नैसर्गिक पालेभाज्या व फळे आपल्या शेतात पिकवल्या आहेत.त्यांचा तीन गुंठा शेतीचा प्रयोग राज्यात आदर्श ठरला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक शेती पाहण्यासाठी येतात.

मनीषा भांगे या खैरेवाडी ता.माढा,जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी असून पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मनीषा भांगे यांच्यावर आली.भांगे यांनी स्वतःला शेतीच्या कामात झोकून देऊन तीन गुंठ्यांत सेंद्रिय शेती विकसित केली.जिद्दीच्या जोरावर त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.या सेंद्रिय शेतीत फळझाडे,फुलझाडे,औषधी वनस्पती याबरोबरच मेथी वांगे,बटाटे,कांदे,मिरच्या,भेंडी,पालक,कोथिंबीर, शेवगा,भोपळा,पेरू,आंबे,चिकू अशा विविध प्रकारच्या फळे व पालेभाज्याची लागवड केली आहे.सध्या बाजारात कृत्रिमरीत्या फळे व पालेभाज्या पिकवून विक्री केली जात आहे.भांगे यांच्या तीन गुंठे शेतीतून निरोगी व विषमुक्त पालेभाज्या व फळे पिकवली जात आहेत.या तीन गुंठे शेतीतून नैसर्गिकरित्या पीक उत्पादन घेतले जात आहे.

गोरक्षनाथ भांगे यांनी शेतीच्या बांधाचाही व्यवसायिक दृष्टीने विचार करून आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतीच्या बांधावर ४०० सागाच्या झाडांची लागवड केली आहे.भांगे यांच्या म्हणण्यानुसार,मुलगा २० किंवा २५ वर्षांचा होईपर्यंत ही झाडे देखील मोठी होणार आहेत.या झाडांची किंमत भविष्यात २० ते २५ लाख रुपये पर्यंत जाईल असे त्यांना वाटते.सागाच्या झाडांबरोबरच शेवग्याच्या शेंगांच्या झाडाची लागवड केली असून त्यातुन आर्थिक उत्पन्न सुरू केले आहे.

भांगे यांच्या सेंद्रिय शेती मध्ये पाच प्रकारची पीक पद्धती विकसित करण्यात आली आहे.यामध्ये फळझाडे,औषधी वनस्पती,भाजीपाला,वनझाडे,खत व्यवस्थापन याचा समावेश आहे.भाजीपाला या पीक पद्धतीमध्ये गादी वाफे तयात करून वांगी,भेंडी,टोमॅटो, दोडका,कारले,दुधी भोपळा,घेवडा,मेथी,पालक,चुका,शेपू,कांदा,लसूण,रताळे आदी पिके घेतली जात आहेत.फळझाडे या पीक पद्धतीमध्ये अंजीर,केशर आंबा,चिकू पेरू,आवळा,जांबुळ,पपई, सीताफळ,केळी, मोसंबी,लोणच्याचे आंबे आदी फळपिकांचे उत्पादन घेतले जात आहे.औषधी वनस्पती पीक पद्धतीमध्ये कोरफड,कडीपत्ता, पुदिना,तुळस,हादगा,शेवगा,आवळा,बदाम,गुंज वेल आदी औषधी वनस्पतींचे उत्पादन घेतले जात आहे.वनझाडे या पीकपद्धती मध्ये सरळ अशोक,लिंब,जट्रोपा,साग आदींचा समावेश आहे. या तीन गुंठा शेतीमध्ये झाडांचा पालापाचोळा गोळा करून चांगल्या प्रकारचे गांडुळ खत निर्मिती केली जात आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web