कल्याण/प्रतिनिधी – डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे वाटप करण्यात आले. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या पुढाकाराने कोविडग्रस्त रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन मोफत देण्यात येत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच रुग्णास ऑक्सिजनची गरज भासल्यास किंवा संवेदनशील परिस्थितीत रुग्णास जिल्ह्याअंतर्गत अथवा जिल्हाबाह्य रुग्णालयात घेऊन जात असताना, ऑक्सिजन अभावी रुग्ण वाटेतच दगावले असल्याची घटना देखील घडत असते. त्याचअनुषगाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची तसेच ऑक्सिजन खाटांची उपलब्धता कमी पडत आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत रुग्णांची ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात राहावी या दृष्टीकोनातून डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बँक योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ कल्याण, डोंबिवली, व इतर शहरांतील कोरोना बाधित रुग्णांना घेता येणार आहे. या योजनेद्वारे कोरोनामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर द्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. यावेळी जिल्हाप्रमुख गोपळ लांडगे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शहर प्रमुख राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, राजेश कदम, संजय पावशे आदी पदाधिकारी उपस्थित होते.