१२ वर्षापासून बळीराजाला उधारीवर देतात कांद्याचे बी

सोलापूर /प्रतिनिधी – महागाईने उच्चांक गाठला असल्याने व्यवहारात कुणी कुणाला सहसा मदत करत नाही. तसेच व्यवसायात पैसे बुडतील या भीतीने उधारीचा व्यवहारही कमी होताना दिसून येतोय. यातच शेती हा बेभरवशाचा व्यवसाय असल्याने बळीराजाच्या मदतीला कुणी पुढे येत नाही. त्यामुळे पीक लागवड शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असतात. अस्मानी संकटांना तोंड देत जगाची भूक भागविण्यासाठी शेतकरी राजा आणि त्याची शेती जगली पाहिजे या हेतूने गेल्या बारा वर्षांपासून शेतकर्‍यांना सहानुभूती म्हणून एक बीज उत्पादक शेतकरी दुसर्‍या शेतकर्‍यांना उधारीवर कांद्याचे बी देऊन मदत करत असतो.

ही कहाणी आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर या गावचे बीज उत्पादक शेतकरी तुकाराम शिंदे यांची. अवघे दहावीचे शिक्षण घेतलेल्या ४४ वर्षीय तुकाराम यांना शेतीची प्रचंड आवड. पण कसण्यासाठी त्यांच्याकडे जमीन नव्हती. आपल्याला शेती हवी या अट्टहासाने ते इतरांच्या शेतात राबराब राबून स्वत:च्या पैशाने आठ एकरची जमीन घेतली. शेती हा व्यवसाय करत असताना त्यांच्या आजूबाजूचे शेतकरी कांद्याचे बीज उत्पादन करत होते. त्या शेतकऱ्यांकडे पाहून त्यांनी कांद्याचे बीज उत्पादन घेण्यास सुरूवात केली. २००९ सालापासून उत्तम दर्जाचे कांद्याचे बी तयार करीत आहे.

मुळात बहुसंख्य शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत नाजूक. त्यांना शेती कसण्यासाठी बऱ्याचदा सावकारांवर अवलंबून राहावे लागते. यातून शेतकऱ्यांच्या कर्जाचा डोंगर वाढत जातो. परिणामी शेतकरी शेती करण्याच्या मानसिक स्थितीत राहात नाही. अशा कठीण काळात त्यांना आधाराची गरज असते. भारतीय शेती आणि शेतकरी जगावे, त्यांच्या हिताचा कुठेतरी विचार व्हावा, ही सामाजिक भावना लक्षात घेऊन त्यांनी शेतकर्‍यांना उधारीवर कांद्याचे बीज देण्याचे ठरवले. सावळेश्वर गावच्या आजूबाजूस असणाऱ्या साबळेवाडी, पोपळी, अर्जुनसोंड, पाकणी, चिंचोली, बीबी दारफळ, विरवडे या गावातील शेतकऱ्यांना ८ ते ९ महिन्याच्या उधारीच्या वायद्यावर देतात.

विशेष म्हणजे कांद्याचे हे बी बाजारभावापेक्षा दोनशे रूपयांनी कमी किमंतीत देतात. शेतकऱ्यांना उधारीवर कांद्याचे बी मिळत असल्याने या बियांचा खर्च ते खते, खुरपणी यावर खर्च करतात. कांदा विकून झाल्यानंतर शेतकरी इनामदारने कांदा बीजच्या उधारीचे पैसे श्री शिंदे यांना ७ ते ८ महिन्यांनी आणून देतात. उत्तम दर्जाचे कांदा बीज आणि तेही उधारीवर मिळत असल्याने दरवर्षी अनेक शेतकरी त्यांच्याकडे बीज घेण्यासाठी येतात. बी उधारीवर मिळते याची माहिती आजूबाजूच्या गावात पसरल्याने ते शेतकरीदेखील येतात. आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून उधारीवरती बीज घेऊन आपली शेती टिकवली आणि जगवली आहे.

या वर्षी अर्धा एकरात 350 किलो कांद्याच्या बिया तयार झाल्या होत्या. दुकानदार पैसे दिल्याशिवाय कांदा बियांच्या पिशवीला हातही लावू देत नाहीत. उधार देणे ही तर दूरची गोष्ट आहे. कांद्याच्या बियांच्या पिशवीची किंमतीपेक्षा दोनशे रुपये कमी किमंतीत हे बी आठ ते नऊ महिन्यांच्या उधारीवर देतो. त्यामुळे आजूबाजूच्या गावातून तयार केलेल्या कांद्याच्या बियांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यातून अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. असे कांदा बीज उत्पादक तुकाराम शिंदे यांनी सागितले

दुकानात शेतकरी कांद्याचे बी खरेदी करण्यास गेल्यास दुकानदार एक रुपयाही कमी करीत नाहीत. त्यामुळे शिंदे यांची ही पद्धत शेतकऱ्यांना सोपी वाटत आहे. ते पैशासाठी वर्षभर थांबतात. एकदा शिंदे यांच्याकडून ५ किलो कांद्याचे बी उधारीवर आणून अडीच एकर कांदा केला होता. त्यावेळी माझ्या शेतात 500 पिशवी कांद्याचे उत्पादन झाले होते मला चागला फायदा झाला होता असे तेहील शेतकरी बधावाने सागितले

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web