कोरोनाग्रस्त कुटुंबियांची सेवा करण्यासाठी सरसावली तरुणाई

कल्याण प्रतिनिधी – पहिल्यापेक्षा अधिक भयंकर असणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक जण प्रभावित झाले आहेत. संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब यामध्ये कोवीड पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने अशा कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र अशा असहाय्य कोवीडग्रस्त कुटुंबासाठी कल्याणातील दोन तरुण इतरांना आदर्श ठरेल अशी रुग्णसेवा करत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एकाच वेळी संपूर्ण कुटुंबच्या कुटूंब पॉझिटिव्ह होत आहेत. तर बऱ्याचदा काही जण होम आयसोलेशनचा पर्याय निवडत आहेत. अशावेळी या कुटुंबांच्या मदतीसाठी कोणी असेल तर ठीक. अन्यथा अशा होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांची परवड सुरूच राहते. अशा असहाय्य रुग्णांच्या मदतीसाठी विकी मोरे या तरुणाने पुढाकार घेतला आहे. अशा रुग्णांसाठी विकी जेवणाचे डबे, औषधे आणून देण्याचे काम तर विकी करतो. केवळ कल्याण नव्हे तर डोंबिवली, ठाणे, भाईंदर, नवी मुंबई आदी ठिकाणी विकीने कोवीड कुटुंबियांची मदत केली आहे. विकी हा व्यवसायाने विमा सल्लागार असून त्याच्यासारख्या या समाजसेवेचा वसा इतरांनीही घेण्याची आज गरज आहे.

तर दुसरीकडे व्यवसायाने शेफ असणारा महेश बनकर हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून कल्याणच्या लालचौकी कोवीड हॉस्पिटलबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांना विनामूल्य पिण्याचे पाणी पुरवत आहे. पाण्याला आपल्याकडे जीवन असे म्हटले जाते. एकीकडे असह्य असा उकाडा आणि दुसरीकडे रुग्णालयात दाखल आपल्या कुटुंब सदस्याची चिंता. या दोन्हीवर महेश प्रेमाची आणि मायेची फुंकर घालण्याचा प्रयत्न आपल्या कामातून करत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना पाणी देण्यासह त्यांची विचारपूस करणे, धीर देणे, प्रेमाचे दोन शब्द बोलणे अशा सध्या दुरापास्त झालेल्या गोष्टी महेश आपल्या या जलदानाच्या कामातून करत आहे. सामाजिक कामांची पूर्वीपासून आवड असलेल्या महेशच्या या अनोख्या सेवेचा आदर्श इतरांनीही घेतला पाहिजे.
एकीकडे विकी मोरे आणि दुसरीकडे महेश बनकर. हे दोघेही तरुण आपापल्या परीने सध्याच्या कठीण काळात आपल्या परीने लोकांना मदतीचा, आपलेपणाचा हात पुढे करत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना दोघांकडूनही या कामाचा न बडेजाव केला जात आहे नाही ढोल बडवले जात आहेत. समाजात कमी होत जाणारी माणुसकी या दोघांसारख्या अनेक व्यक्तींमुळे आजही जिवंत असल्याचेच दिसून येत आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web