कोवीडच्या गंभीर रुग्णांना प्लाझ्मा थेरपी उपयोगी नाही, आयसीएमआरच्या नविन गाईडलाईन

कल्याण/प्रतिनिधी – इंडियन कौन्सिल फॉर मेडीकल रिसर्च (आयसीएमआर) आणि महाराष्ट्र शासनाने प्लाझ्माबाबत नविन गाईडलाईन्स जारी केल्या असून कोवीड झालेल्या गंभीर रुग्णांना प्लाझ्मा थेरपी उपयोगी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामूळे खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांनी मध्यम गंभीर किंवा अति गंभीर स्वरूपाच्या कोवीड रुग्णासाठी प्लाझ्मा आणण्यासाठी पाठवू नका असा महत्वपूर्ण सल्ला इंडियन मेडीकल असोसिएशनचे कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना आजारावर आणि उपचार पद्धतीवर सगळीकडेच अभ्यास – संशोधन सुरू आहे. आपल्याकडेही आयसीएमआरकडून याबाबत सतत अभ्यास सुरू असून त्यानूसार हे नविन निर्देश जारी करण्यात आले आहेत. कोवीड पेशंटवर प्लाझ्मा थेरपी कधी करावी हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. अभ्यासाप्रमाणे पेशंट कोवीड पॉझिटिव्ह झाल्यानंतर पहिल्या 4-5 दिवसांत प्लाझ्मा देणे आवश्यक असल्याचे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले. तसेच सुरुवातीला रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडी नसल्याने या प्लाझ्माची कोवीडशी लढण्यास मोठी मदत होते. परंतु आपल्याकडे कोवीड पेशंट गंभीर झाल्यावर प्लाझ्मा थेरपी वापरली जात असली तरी गंभीर रुग्णाला ती अजिबात फायदेशीर नसल्याचे आयसीएमआरच्या अभ्यासात समोर आल्याचेही डॉ. पाटील म्हणाले. त्यामूळे ही प्लाझ्मा थेरपी मध्यम गंभीर किंवा अति गंभीर स्वरूपाच्या पेशंटवर न वापरण्याचा सल्लाही आयसीएमआरने दिला आहे. 

परदेशात प्लाझ्मा थेरपी वापरत नाहीत…
आपल्याकडे कोवीड रुग्णासाठी प्लाझ्मा थेरपी ही सुरुवातीच्या काळात उपयुक्त असून अमेरिका इंग्लंडमध्ये मात्र या थेरपीचा वापर केला जात नाही. अमेरिकेत मोनोक्लोनल अँटीबॉडीजची उपचार पद्धती वापरत असल्याचे डॉ. पाटील म्हणाले. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची हलक्या स्वरूपाची लक्षणे असल्यास त्याला उपचार केंद्रावर बोलावले जाते आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीजची बॅग सलाईनप्रमाणे चढवली जाते. त्यानंतर पुढील 2 ते 3 तास निरीक्षण करून मग घरी सोडले जाते. तिकडे अशाप्रकारे सुमारे 70 ते 80 टक्के रुग्णांवर असे उपचार केले जातात. तर जो बरा होत नाही त्यावर रुग्णालयात दाखल करून इतर उपचार केले जात असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. आपल्याकडे असणारी मोठी लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांची संख्याही अधिक आहे. त्यामूळे सुरुवातीच्या काळात कोवीड रुग्णाला प्लाझ्मा थेरपी देता येईल अशी यंत्रणाही आपल्याकडे सध्या अस्तित्वात नसल्याचे सांगत आपल्याकडे सुमारे 80 टक्के लोकं नॉर्मल कोवीड औषधांनी बरे होत असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.

अशी काम करते प्लाझ्मा उपचार पद्धती…
कोवीड इन्फेक्शनशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. हा व्यक्ती कोरोनातून बरा झाल्यावर या अँटिबॉडी काढून दुसऱ्या कोवीड रुग्णाला दिल्या जातात. ज्या त्याच्या शरीरात जाऊन कोवीडशी लढण्यासाठी मदत करतात. पण सुरुवातीच्या काळातच या अँटिबॉडी देऊन फायदा असल्याचा पुनरुच्चार डॉ. पाटील यांनी यावेळी केला. पहिल्या 4 दिवसांत या अँटिबॉडी देणे फायदेशीर असून त्यानंतर प्रत्येक कोवीड रुग्णामध्ये त्या तयार होण्यास सुरुवात होते. शरिरात असणाऱ्या कोवीड विषाणूची वाढ 9 ते 10 दिवसांनी आपोआप थांबते. मात्र त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या फुफ्फुसात झालेल्या नुकसानामुळे तो झगडत असतो. पोस्ट कोवीड आजारांसाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त नसल्याचे डॉ. पाटील म्हणाले.

रुग्णालय आणि डॉक्टरांना कळकळीची विनंती…

जे कोवीड रुग्ण आयसीयू किंवा आयसीसीयुमध्ये ऍडमिट आहेत. त्यांच्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा काहीही रोल नाहीये. त्यामूळे अशा रुग्णांच्या नातेवाईकांना प्लाझ्मा आणण्यासाठी धावपळ करण्यास अजिबात सांगू नका अशी कळकळीची विनंती यावेळी डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी केली. आयसीएमआर आणि महाराष्ट्र शासन कोवीड उपचारात कोणताही रोल नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नातेवाईकांना प्लाझ्मा आणण्यासाठी पाठवू नका असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web