कारागृहाची भिंत ओलांडून पळालेला कैदी चार वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात

डोंबिवली/ प्रतिनिधी – कल्याण आधारवाडी  कारागृहामागील बाजूची मोठी भिंत ओलांडून 4 वर्षांपूर्वी दोन कैदी पळून गेले होते. त्यापैकी एका कैद्याला मुंबई गुन्हे कक्ष 4 च्या पोलीस अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील उलवे परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांनतर मंगळवारी रात्रीच्या सुमारास या कैद्याला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या स्वाधीन  केले.  खडकपाडा पोलिसांनी  त्याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून त्याच्यावर अटकेची कारवाई केली.
      गुरुवारी या कैद्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डेव्हिड मुर्गेश देवेंद्र (27) असे अटक केलेल्या कैद्याचे नाव आहे. 23 जुलै 2017 रोजी पहाटेच्या सुमारास आधारवाडी कारागृहामागील भिंत केबलच्या साह्याने ओलांडून डेव्हिड आणि त्याचा साथीदार मनीकंडर नाडर हे दोघे पळून गेले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पुढे येताच जेल प्रशासनाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले  होते. तर त्यावेळेच्या जेल अधीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी करून चौकशी सुरु केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेलमधून पळून गेल्यावर हे दोघे आरोपी कन्याकुमारीला गेले. तेथे ही ते चोऱ्या, दरोडे, घरफोड्या करू लागले. मात्र तेथे अटक केल्यानंतर तिथल्याही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन डेव्हिडने पुन्हा महाराष्ट्रात पळ काढला. तो नवी मुंबईच्या उलवे परिसरात नाव आणि वेष पालटून राहून एका पाणी विक्रेत्याकडे काम करू लागला. याच दरम्यान डेव्हिडला मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती. त्याचा साथीदार नाडर याला महात्मा फुले पोलिसांनी 2016 मध्ये अटक केली होती. या दोघांच्या विरोधात अनेक दरोडे, चोऱ्यांसारखे  गंभीर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने जामीन नाकारल्याने त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती. जेलमधून पळून जातानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यावेळी कारागृहातील पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जेलमधून पळण्यासाठी रचला प्लॅन : दोघांनी पळून जाण्यासाठी कारागृहातील बंद असलेल्या सीसीटीव्हीची वायर कापली. तिचा दोरीसारखा वापर करून कारागृहाच्या भिंती ओलांडल्या. कारागृहाचे दैनंदिन कामकाज सकाळी सुरू झाले. तेव्हा दोघेही 5 नंबरच्या बराकीत होते. प्रसाधनगृहात जाण्याचा बहाणा करून दोघे बाहेर पडल्याचे काही कैद्यांनी पाहिले होते. बराच काळ सापडत नसल्याने जेल पोलिसांनी आधी बराकीत शोध घेतला. तोपर्यंत या दोन्ही कैद्यांनी भिंतीवरून उड्या मारल्या होत्या. नंतर ते कल्याण खाडीवरील वाडेघर-सरवली जाणाऱ्या लोखंडी पुलावरू कल्याण-भिवंडी मार्गावरील सरवली एमआयडीसीच्या दिशेने पळाले होते. या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला त्यांनी अडविले. तो मोबाईलवर बोलत होता. त्याचा मोबाईल हिसकावून हे कैदी त्याची दुचाकी घेऊन पळ काढण्याच्या बेतात होते. तेव्हा त्यांच्यात झटापट झाली. त्यात त्यांच्यातील एका कैद्याच्या तोंडाला मार लागला होता. डेव्हिड देवेंद्र हा पोलिसांच्या ताब्यात आला आहे. आता त्याचा साथीदार मनीकंडर नाडर याला हुडकून काढण्यासाठी खडकपाडा पोलिस जंग जंग पछाडत आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web