कल्याण डोंबिवलीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न

कल्याण/ प्रतिनिधी – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात कोणतीही दुर्घटना होवू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी फायर, इलेक्ट्रिक आणि  ऑक्सिजन पुरवठयाचे  ऑडिट करण्यासाठी शासनमान्य तज्ञ संस्थेची नेमणूक करावी,  असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संपन्न झालेल्या बैठकीत  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले.

      या बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,‍ कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, राजू पाटील, रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  हे ऑनलाईन आणि पालकमंत्र्याचे खाजगी सचिव बालाजी खतगावकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. राजेश कवळे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त आरोग्य प्रशासन सुधाकर जगताप, महापालिकेच्या वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समिर सरवणकर प्रत्यक्ष उपस्थित होते.

 खाजगी रुग्णालयांची दोन वेळा बैठक घेवून त्यांना ऑडिट करुन घेणेबाबत स्पष्ट सुचना दिल्या आहेत आणि ऑक्सिजन पुरवठयाच्या नियमनासाठी  त्रयस्थ पक्षिय लेखा परिक्षणाची नेमणूक केली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. रुग्णालयातील ५० ते ६० टक्के  ऑक्सिजन  शिल्लक असेपर्यंत त्याची आगाऊ सुचना देणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री यांनी यावेळी मांडले असता काही रुग्णालये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल करुन घेतात आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो अशी माहिती आयुक्तांनी दिली.

  रुग्णालयातील रुग्णांना आवश्यक असलेले रेमिडीसिविर इंजेक्शन योग्य प्रमाणात दिले जात नाही याची पाहणी करण्यासाठी दक्षता पथक नेमावे, असे निर्देश पालकमंत्री यांनी या बैठकीत दिले. महानगरपालिकेने रेमिडिसिविरचा वापर, ऑक्सिजन पुरवठयाचे नियमन करण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक केली असल्याची माहिती आयुक्तांनी या बैठकीत दिली त्याचप्रमाणे 30 हजार रेमिडिसिवरची मागणी पुरवठादारांकडे केली आहे असेही त्यांनी  सांगितले. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असून जास्त कोटा रिलीज झाला की ही समस्या सुटेल असा दिलासा पालक मंत्र्यानी यावेळी दिला.

रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाची सदयस्थिती कळत नाही त्यामुळे प्रत्येक रुग्णाची माहिती दिली जाणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री यांनी सांगताच महापालिकेच्या कोविड रुग्णालयांत हेल्पडेस्क तयार केले असून त्याद्वारे माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना दिली जाते, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

कोविड बाधित रुग्णाला बेड मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते, त्‍या कालावधीत त्याचे सॅचुरेशन  कमी होते, अशा रुग्णांस तातडीने ऑक्सिजन उपलब्ध करुन दयावा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना या बैठकीत केली. यासाठी महानगरपालिकेने मोठया प्रमाणात ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची मागणी करावी, असे निर्देश पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिली. महानगरपालिकांकडून मागणी घेवून डीपीसी फंडातून हा खर्च करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बैठकीत दिली.

शहापूर,मुरबाड सारख्या ग्रामीण भागातही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर द्यावेत अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी या बैठकीत केली, आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वेत ऑक्सिजन प्लांट तयार करण्यासाठी एक कोटींचा आमदार निधी देत असल्याची माहिती यावेळी दिली. तर ग्रामीण भागात कोरोना वाढीस इतर राज्यातून येणा-या स्थलांतरीत नागरिकांचा मुद्दा आमदार राजू पाटील यांनी उपस्थित करता सदर नागरिकांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यांनी यावेळी केले.

१ मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी सुरु होणा-या लसीकरणासाठी १० प्रभागात १० सेंटरची व्यवस्था करण्यात येत असून प्रती सेंटर ५०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. नविन सेंटरसाठी एसओपी   तयार करण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web