सोलापूर/प्रतिनिधी – गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर घोंगावत आहे.या संकटाच्या काळात जनसामान्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला.त्यापैकी एक अभिनेते राहुल पद्मिनी नवनाथ राजे यांच्या लव यू महाराष्ट्र टीमनेही सामाजिक बांधिलकी जपत एक चळवळ उभी करून आतापर्यंत २५ अत्यवस्थ कोविड रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.
याबाबत सविस्तर हकिकत अशी कि लव यू महाराष्ट्र टीमने रक्त,औषधे,प्लाझ्मा गरजू्पर्यंत पोहोचवली आहेत.तसेच बेडची उपलब्धता करुन आतापर्यंत २५ रुग्णांचे जीव वाचवलेले आहेत.याशिवाय एक हजार सहाशेपेक्षा जास्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केलेला आहे.परप्रांतीय मजूरांना गावी परतण्यासाठी प्रशासनाच्या सहकार्याने बस उपलब्ध करणे,त्यांचा तिकीट खर्च भागवणे याबाबतीतही टीमने मोलाची मदत केलेली आहे.जिगरी,मुंबई सेंट्रल,प्रेमांतर अशा चित्रपटातून मुख्य भूमिका केलेल्या राहुल राजे यांनी लॉकडाऊन काळात नैराश्याने ग्रासलेल्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी,समाजप्रबोधन व जनजागृती करण्यासाठी सुरु केलेल्या लव यू महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलपासून सुरु झालेली ही चळवळ आता टीमच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचलेली आहे.त्यामुळे पडद्यावरचा हिरो रियल लाईफमध्येही हिरो असल्याचे राहुल राजे यांनी दाखवून दिले आहे.
एखाद्या गरजूंना योग्य वेळी मदत मिळावी.यासाठीच आमची चळवळ आहे.माणुसकीच्या दृष्टिकोनातून निस्वार्थपणे मदत करणाऱ्या हातांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.आम्ही तर केवळ निमित्तमात्र आहोत.गरजूंच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमचे समाधान आहे.या संकटकाळात कुणाला कसलीही गरज पडली तरी त्यांनी बिनधास्त संपर्क करावा.खातरजमा करुन शक्य होईल तेवढी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करु.या उपक्रमात अभिनेत्री पूजा चांदूरकर,मयूर चांदूरकर,प्रविण चौगुले,मित्र परिवार व देवा ग्रुप चित्रपट संघटना सहभागी झाले आहेत असे सिनेअभिनेता राहुल पद्मिनी नवनाथ राजे यांनी सांगितले.