पत्रकाराने केले दोनदा प्लाझ्मा दान, कोरोनाग्रस्तांना मिळाले जीवदान

सोलापूर/प्रतिनिधी – कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आपल्या शरीरात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तयार झालेली प्रतिपिंडे इतर गरजू रुग्णांना मिळावेत यासाठी रक्तद्रव अर्थात प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन वेळोवेळी करूनही त्याला  प्रतिसाद मिळाला नाही. आपला प्लाझ्मा दान केल्यामुळे कोणत्यातरी कोरोनाग्रस्त रुग्णांचा जीव वाचेल या भावनेतून सोलापुरातील एका पत्रकाराने दुसर्‍यांदा प्लाझ्मा दान करून सगळ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. दीपक होमकर असे त्यांचे नाव असून त्यांच्या या दानशूर वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मूळचे सोलापूरचे असलेले दीपक होमकर सध्या पुणे येथे स्थायिक असून लोकमतमध्ये उपसंपादकपदी रुजू आहेत. २३ फेबृवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यातून ते बरे झाल्यानंतर बाहेर कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थितती पाहून आपल्यामुळे कोणाचे तरी प्राण वाचत असतील तर आपण प्लाझ्मा दान केले पाहिजे, असा निर्णय घेतला. त्यांनी फेसबुक व व्हाट्सअप स्टेटसवर त्यांचा कोरोना रिपोर्ट जाहीर करत ज्यांना कुणाला प्लाझ्मा हवा त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

त्यानंतर दीपक यांना प्लाझ्मा साठी फोन आले आणि ३ एप्रिल रोजी त्यांनी पिंपरी चिंचवड येथील एका गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णाला पहिल्यांदा प्लाझ्मा दान केले. सोशल मिडियावर त्यांच्या प्लाझ्मा उपलब्धतेचा मेसेज व्हायरल झाल्याने त्यांना पुन्हा फोन येत राहिले. प्लाझ्मादान ही प्रक्रिया सोपी असून दर पंधरा दिवसानी प्लाझ्मादान करता येऊ शकते अशी माहिती रक्तपेढीने दिल्याने १५ दिवसांनी त्यांना पुन्हा दुसर्‍या गरजू गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांचा प्लाझ्मादानसाठी फोन आला, तेंव्हा त्यांनी २० एप्रिल रोजी पुण्यातील केईएम मध्ये जाऊन प्लाझ्मा दुसऱ्यांदा दान केले.

दीपक होमकर सांगतात, “कोरोनातून बरा झाल्यावर ज्यावेळी माझी अँटीबॉडीजची चाचणी झाली. त्यात माझ्यात कोव्हिडच्या अँटीबॉडीज चांगल्या असल्याचे समजल्यावर मी पहिल्यांदा प्लाझ्मा दिला. सामाजिक भावनेतून मी हे योगदान देत आहे. प्लाझ्मा प्रत्यक्ष डोनेट करण्यासाठी सुमारे तासाभराचा कालावधी लागतो. रक्त तपासणी करून प्रतिपिंडाचे प्रमाण तपासले जाते. दात्याचे रक्त घेऊन त्यातून रक्तद्रव वेगळा केला जातो आणि उर्वरित रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात सोडले जाते.”

आपल्या निर्भीड लेखणीच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांवर वाचा फोडणारे पत्रकार दीपक होमकर यांनी यापूर्वी अनेकदा रक्तदान देखील केले आहे. कोरोना काळात प्लाझ्मा दान करणारे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात असताना दीपक सारखे प्लाझ्मा दाते आपला दानशुरपणा दाखवून इतरांना प्रेरणा देत आहेत. पत्रकार केवळ आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकांना केवळ उपदेशाचे डोस पाजत नाही तर समाजाला ज्या-ज्या वेळेस गरज पडते तेव्हा प्रत्यक्ष कृतीतून मदत करतात याचा अनुभव पाहायला मिळाला. प्लाझ्मा दान करण्यापूर्वी रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना प्लाझ्मा दानचे किती पैसे घेणार असे विचारणा केली. मात्र त्यांनी ते पैसे घेण्यास नकार दिला. प्लाझ्मा दान केल्यानंतरही रुग्णाच्या   नातेवाईकांनी पैसे घेण्यासंदर्भात एसएमएस करून नम्रपणे विचारणा करीत होते. मात्र दीपक यांनी ते पैसे ऑक्सिजन आणि रेमडेसिविर औषधांवर खर्च करण्यास सांगितले. प्लाझ्मा ही निसर्गाची देण आहे. त्याच दान होवू शकत व्यापार नाही, असे सांगत प्लाझ्मादान करा, त्याचे पैसे घेऊन आपल्याच रक्ताची किंमत करु नका, असा संदेश दिला.

कोविड-19 या आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तामध्ये कोविड-19 या विषाणूविरोधी प्रोटिन तयार होते. हे प्रोटिन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या प्लाझ्मामार्फत, जर एखाद्या कोविड संसर्ग झालेल्या रुग्णास दिला तर हे प्रोटिन कोरोना विषाणूला मारायला मदत करते व रुग्ण लवकर बरा होतो, असे तज्ञांचे मत असल्यामुळे प्लाझ्माला मोठी मागणी आहे

.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web