कल्याण/प्रतिनिधी – कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत असताना आता उंबर्डे येथे उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पातही आज दुपारी आग लागल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असून या आगीमध्ये कचरा विलगीकरण करणाऱ्या एका मशीनचे मोठे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
वाडेघर डम्पिंगवरील भार कमी करण्यासाठी केडीएमसीच्या वतीने ठिकठिकाणी कचरा वर्गीकरण प्रकल्प आणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहेत. उंबर्डे येथे कचरा वर्गीकरण प्रकल्प उभारण्यात आला असून दररोज याठिकाणी हजारो किलो कचरा वर्गीकरणासाठी येत असतो. या प्रकल्पात असलेल्या सुक्या कचऱ्याला आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास येथील साठवून ठेवलेल्या कचऱ्याला आग लागली असून अग्निशमन दलाच्या वतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती स्थानिक नागरिकानी यांनी दिली.
तर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना याबाबत विचारले असता, शॉर्ट सर्किटमुळे येथील सुक्या कचऱ्याला आग लागली असून या आगीमुळे येथील एका मशीनचे नुकासन झाले असले तरी बाकी प्रकल्प सुरु राहणार असून अग्निशमन दलाच्या वतीने आग विझविण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.