सोलापूर विद्यापीठात टीव्ही व रेडिओ स्टुडिओ आणि पुरातत्व संग्रहालयाचे ऑनलाइन उद्घाटन

सोलापूर प्रतिनिधी– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये टीव्ही व रेडिओ स्टुडिओ त्याचप्रमाणे इकॉनॉमिक्स लॅब आणि पुरातत्व संग्रहालय यांची करण्यात आलेली उभारणी हे महत्वपूर्ण असून यामुळे विद्यापीठाचा नावलौकिक वाढेल, असे मत आयजीएनसीएचे सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी व्यक्त केले. मंगळवारी, विद्यापीठातील टीव्ही स्टुडिओ, इकॉनॉमिक्स लॅब आणि पुरातत्त्वशास्त्र म्युझियमचे उद्घाटन व लोकार्पणाचा सोहळा ऑनलाइन पद्धतीने पार पडला. यावेळी डॉ. जोशी हे बोलत होते. याप्रसंगी जी बी पंत युनिव्हर्सिटी ऑफ एग्रीकल्चर अँड टेक्नॉलॉजी, उत्तराखंड येथील कुलगुरू डॉ. तेजप्रताप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस ह्या होत्या. प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा आणि प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

डॉ. जोशी म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव असलेल्या या विद्यापीठांमध्ये इकोनॉमिक्स लॅब उभारण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा प्रकल्प देशांमध्ये कुठेही नाही. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र सहजपणे समजून घेता येईल. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ही लॅब आदर्शवत आहे.
विद्यापीठातील पुरातत्व संग्रहालय हे देखील आपला इतिहास आणि संस्कृती समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. यादृष्टीने विद्यापीठातील पुरातत्व विभागाने परिपूर्ण संग्रहालय उभारले आहे, असे सांगून डॉ. जोशी म्हणाले, यापुढच्या काळात ज्ञानाचा प्रसार करण्याचे नवे साधन माध्यमे बनली आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात स्टुडिओ विद्यापीठाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. विद्यापीठाचे हे तीनही प्रकल्प अतिशय चांगल्या रीतीने उभारल्याबद्दल कुलगुरू डॉ. फडणवीस आणि सहकाऱ्यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

कुलगुरू डॉ. तेजप्रताप सिंग म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासारखी इकॉनॉमिक लॅब भारतात कुठेही नाही. त्यामुळे मी भारतातल्या अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना मी असे सांगेन की, तुम्हाला जर इकॉनॉमिक्स लॅब बघायची असेल तर सोलापूरला विद्यापीठात जा. विद्यापीठांमध्ये जे पुरातत्व संग्रहालय उभारण्यात आलेले आहे, तेदेखील खूप चांगले असून जिल्ह्यातील पुरातत्त्व वारसा शोधण्याचे व जतन करण्याचे काम करीत आहे, ही विद्यापीठाच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी आहे. मिडिया लॅबमुळे विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल असेही ते म्हणाले .

कुलगुरू डॉ. म्हणाल्या की, विद्यापीठांमध्ये इकोनॉमिक्स लॅब उभी करण्याची संकल्पना माझ्या मनात अनेक वर्षापासून होती, ती आता मूर्त स्वरूपात आली आहे. या ठिकाणी जवळपास 40 मॉडेल्स उभारण्यात आलेले आहेत. मॉडेल्स तयार करण्यासाठी विद्यापीठातील सुतार पठाण यांचे सहकार्य लाभले आहे. विद्यापीठात सुरू झालेल्या रेडिओ आणि टीव्ही स्टुडिओच्या माध्यमातून विद्यापीठाकडे असणार्‍या सुविधांमध्ये फार मोलाची भर पडली आहे, त्याचा उपयोग विविध विभागांना होऊ शकतो आणि त्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घेता येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात उत्खननाचे खूप चांगले काम झाले आहे आणि उत्खननातील मिळालेला प्राचीन ठेवा या संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आलेला आहे. या उत्खननातून विद्यार्थ्यांनादेखील चांगला अनुभव मिळतो. विद्यापीठांमध्ये आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन समोर ठेवून काम चालते असेही त्या म्हणाल्या.

प्रारंभी सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. जी. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अंबादास भासके यांनी केले. याप्रसंगी तीनही प्रकल्पांची माहिती देणारा एक माहितीपट दाखविण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य डॉ.एस. डी. राऊत आणि प्रा. चंद्रकांत गार्डी यांनी केले. कार्यक्रमात पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील, पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे, पुरातत्व विभागाचे डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web