कल्याण प्रतिनिधी – कोरोना बाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कल्याण मधील मॅरेज लॉन्स सील केल्याची कारवाई महानगरपालिकेने केली आहे. कल्याण पश्चिम येथील भवानी मॅरेज लॉन्स व वैष्णवी मॅरेज लॉन्स ३ एप्रिल रोजी रात्री लग्न समारंभाच्या कार्यक्रमाकरीता केवळ ५० व्यक्तिंना सहभागी करण्याचे आदेश असतांना देखील याठिकाणी ९०० ते १००० लोकांची गर्दी जमा केली होती. हि बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यामुळे महात्मा फुले चौक पोलिस स्थानकातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांनी या लग्न समारंभाचे आयोजक सुनिल राजाराम वायले, सुरेश गंगाराम म्हात्रे आणि मॅरेज लॉन्स व्यवस्थापक रमेश लक्ष्मण सिंग यांच्या विरुद्ध नियमांचे उल्लंघन केल्यामुळे महात्मा फुले पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. 225/2021 भादवी 188,269,270 व साथीचे रोग अधिनियम (2)(3)(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कोविड नियमांचे उल्लघन केल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार सदर दोन्ही लॉन्स ३० एप्रिल पर्यंत सील करण्याची कारवाई आज क प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे यांच्या मार्फत करण्यात आली.