कल्याण प्रतिनिधी- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारच्या वतीने अनेक निर्बंध लागू करण्यात आले असून यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा भाग असलेल्या रिक्षा चालक, एसटी बस चालक, वाहक आणि इतर व्यवसायिक वाहन चालकांना आपली आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असणार असून कोविड निगेटिव्ह रिपोर्ट असणे गरजेचे आहे. याबाबत आज कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, महात्मा फुले पोलीस स्टेशनचे व.पो.नि. नारायण बानकर आणि इतर पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालक, नागरिक, बस चालक वाहक, प्रवासी यांच्यात जनजागृती केली.
रिक्षामध्ये केवळ दोन प्रवासी, एसटी आणि टॅक्सीमध्ये प्रवासी क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांना परवानगी असणार आहे. रिक्षाचालकांना आपली आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असणार असून १० एप्रिल पर्यंत हि टेस्ट करायची आहे. तर ४५ वर्षावरील चालकांना येत्या १५ दिवसाच्या आत आपले लसीकरण करून तो रिपोर्ट देखील सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे. प्रवासी आणि रिक्षा चालक यांनी देखील मास्क वापरणे गरजेचे आहे. एसटी बस मध्ये केवळ बसण्याची आसनक्षमता आहे तेवढ्याच प्रवाशांची वाहतूक करता येणार असून एसटी बस चालक आणि वाहक यांना देखील आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.