जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई प्रतिनिधी- मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०१८-१९ . २०१९-२० व २०२०-२१ या तीन वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक व  युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज  १५ एप्रिल २०२१ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन २०१८-१९, २०१९-२० व २०२०-२१ या तीन वर्षाकरिता प्रत्येकी १ युवक, १ युवती आणि १ संस्था असे प्रतिवर्षी एकूण ०३ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

(अ) युवक/युवती पुरस्कार

(१) पुरस्कार वर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कारार्थीचे वय १३ वर्ष पूर्ण असावे, तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षाच्या आत असले पाहिजे.

(२) अर्जदार हा मुंबई उपनगर जिल्ह्यात सलग ५ वर्ष वास्तव्यास असला पाहिजे.

(३) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तिपत्रे, चित्रफिती, फोटो इ. जोडावेत. (गत तीन वर्षाच्या १ जून ते ३१ मे या कालावधीतील कार्याबाबतच्या माहितीसह सादर करावेत.)

(४) केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

(ब) संस्था युवा पुरस्कार

(१) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था ५ वर्षे कार्यरत पाहिजे.

(२) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार पंजीबद्ध असावी.

(३) गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याची वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, फोटो इ. जोडावेत.

वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता विहीत नमुन्यातील अर्ज पाठविण्याची मुदत वाढविली असून इच्छुकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज, दि. १५ एप्रिल, २०२१ पर्यंत सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुलीरोड, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४००१०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२२ – २८८७११०५ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web