कल्याण प्रतिनिधी – बंगल्यातील तिजोरी चोरट्याने उचलून नेल्याचा प्रकार डोंबिवली पूर्वेतील मिलापनगर येथे उघडकीस आला असून हि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मिलापनगर एमआयडीसी मधील इंद्रप्रस्थ, प्लॉट क्र. आरएल ६९ या बंगल्यातील अनिल मेहता आपल्या पत्नीसह त्यांच्या अमेरिकेतील मुलाकडे राहण्यास गेले होते. ३१ मार्च रोजी पहाटे तीन दरम्यान चोरट्याने त्यांच्या बंगल्यात येऊन खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला आणि छोटी तिजोरी उचलून घेऊन गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
चोरट्याने जाताना सीसीटीव्ही मध्ये आपली छबी कैद होऊ नये यासाठी घरातील डीव्हीआर सोबत घेऊन गेला मात्र शेजारच्या बंगल्यातील सीसीटीव्ही मध्ये तो कैद झाला. या तिजोरी मध्ये ६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २५ हजार रोख रक्कम, ५० ग्रॅम वजनाचे चांदीचा ताम्हण दिवा तसेच बँक लॉकर, कारच्या चाव्या व महत्त्वाची कागदपत्रे होती.
मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दखल केला असून तपास चालू केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या सूचनेनुसार सदर बंगल्याचा परिसरातील लेन मधील सर्व रहिवाशांनी रात्रीसाठी एक रखवालदाराची नेमणूक केली होती. मिलापनगर मध्ये काही दिवसांपासून घरफोड्या, चोऱ्या यांचे प्रमाण वाढले आहे असे स्थानिक रहिवासी राजू नलावडे यांनी सांगितले.