सोलापूर /अशोक कांबळे – नुकत्याच पार पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बार्शीच्या विनोद कांबळे दिग्दर्शित “कस्तुरी” या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून गौरविण्यात आले आहे.पहिल्याच प्रयत्नात कस्तुरी चित्रपटाने सुवर्ण कमळावर आपली मोहर उमटवली आहे. त्याबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद कांबळे म्हणतात की,माझे आई-वडील,सफाई कामगार आहेत.त्यामुळे लहानपणी जीवन जगत असताना आलेल्या अडचणी म्हणजे स्वतःच्या सामाजिक वेदनेतून तयार झालेला कस्तुरी चित्रपट होय.
बार्शीतील एका सफाई कामगाराचा मुलगा ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कस्तुरी चित्रपटाच्या दिग्दर्शका पर्यंतचा जीवनप्रवास उलघडताना विनोद कांबळे म्हणतात की,प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बार्शीत झाले.पुढे सर्व मित्र इंजिनियरिंगला गेले त्यामुळे इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. सातारा जिल्ह्यातील कराड येथून सिव्हिल इंजिरयरिंग पूर्ण केले.त्यानंतर एक वर्ष एमपीएससीचा अभ्यास केला.एमपीएससी चा अभ्यास करीत असताना आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली.एमपीएससीच्या परीक्षेसाठी पुण्यातील आकुर्डीला नंबर आला होता.परीक्षेच्या शेवटच्या 10-15 पंधरा मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिकेच्या पाठीमागे चित्रपटाची पटकथा लिहली होती.तेथेच ठरवले की ,स्पर्धा परीक्षा सोडून सिनेमाच्या क्षेत्रात जायचे.तेथून कथा-पटकथा लिहण्यास सुरवात केली.भरपूर सिनेमे बघितले.अवांतर वाचन केले.बार्शीत चित्रपट गृहात सिनेमा पाहत असताना आपले ही नाव पडद्यावर यावे असे वाटत असे.त्यानुसार वाटचाल करण्यास सुरुवात केली.आजूबाजूच्या घटना पहात होतो.सफाई कामगाराचा मुलगा म्हणून अनेक अडचणी सोसल्या व त्यातून कस्तुरची कथा सुचली.
कस्तुरी चित्रपटाची कथा म्हणजे एक मुलगा आठवीत शिक्षण घेत असतो.त्याला शिक्षण घेण्याची खूप इच्छा असते पण परिस्थिती सतत आडवी येते.तो साफसफाई, टॉयलेट साफ करण्याचे काम करत असतो.वडील पोस्टमार्टमचे काम करीत असतात.वडिलांबरोबर काम करू लागतो.या कामामुळे त्यांच्या शरीराची येणारी दुर्गंधी त्याला सहन होत नाही.त्यामुळे त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो.त्याला माहिती मिळते की,कस्तुरी नावाचा पदार्थ आहे त्याचे अत्तर बनवले तर त्याचा सूगंध महिना-महिना जात नाही.त्यामुळे चार चौघात बसता येते.अशी त्या मुलाची समजूत होते.त्यावरून मुलगा कस्तुरी कस्तुरी शोधू लागतो.कस्तुरी मिळवताना त्याच्यात झालेला बदल म्हणजे कस्तुरी चित्रपट होय.या चित्रपटातून भगवान गौतम बुद्धांनी सांगितल्या प्रमाणे स्वयं-प्रकाशित व्हा असा संदेश दिला आहे.सफाई कामगाराचा मुलगा म्हणून लहानपणी जे अनुभवले होते ते चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.वेगवेगळ्या क्षेत्रातील 8 कर्तबगार महिलांनी एकत्र येत पुण्यात insight films production निर्मिती करून कस्तुरी या चित्रपटाची निमिर्ती केली आहे.कस्तुरी चित्रपटाचे सर्व चित्रीकरण बार्शीत चित्रित झाले आहे.या चित्रपटात समर्थ सोनवणे,अनिल कांबळे,वैशाली केंदले,मलसिद्ध देशमुख, अजय चव्हाण,कुणाल पवार,जयभीम शिंदे,विजय शिखरे,वाहिदपाशा शेख,लालाभाई शेख या बार्शीतील कलाकारांनी काम केले आहे.
कस्तुरी चित्रपटात सफाई कामगारांच्या आयुष्यात येत असणाऱ्या अडचणी व त्यांचे समाजातील स्थान महत्वाचे असून देखील कायमच दुर्लक्षित आहेत.हे अत्यंत उघडपणे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.या सगळ्या व्यवस्थेतून बाहेर पडून स्वतःच आयुष्य सुगंधित करण्यासाठी शिक्षण हे एकमेव आपल्या आयुष्यातील कस्तुरी आहे.ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सुगंध सर्वदूर पसरू शकतो आसा उत्तम संदेश या चित्रपटातुन देण्याचा प्रयत्न केला असल्याचे शेवटी दिग्दर्शक विनोद कांबळे यांनी सांगितले.