कोरोना काळातही केडीएमसीच्या तिजोरीत विक्रमी ४२७ कोटी कर भरणा

कल्याण प्रतिनिधी– कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत यंदा विक्रमी कर भरणा झाला आहे. कोरोना असतानाही पालिकेने यावेळी तब्बल 427 कोटी 50 लाखांची विक्रमी कर वसुली केली आहे. पालिकेच्या इतिहासात जमा झालेली कराची ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. मालमता कराप्रमाणेच पाणी बिलाचीही यावेळी 67 कोटींची सर्वाधिक वसुली झाली असून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने 15 ऑक्टोबर 2020 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत 75 % व्याज माफीची अभय योजना लागू केली होती. त्याला करदात्यांनी भरभरून प्रतिसाद देत 230 कोटी 85 लाखांचा पालिकेकडे करभरणा केला. तर सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात 425 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जे पूर्ण करत त्यापेक्षा अधिक म्हणजेच 427.50 कोटी रुपये वसूल करण्यात आले. जे गेल्या वर्षापेक्षा तब्बल 134 कोटी 41 लाखांनी जास्त आहे.

विशेष म्हणजे संपूर्ण वर्षभर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेकरीता महापालिकेचा बहुतांश कर्मचारी वर्ग गुंतलेला होता. त्यानंतरही आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केलेलं सूक्ष्म नियोजन त्याला लाभलेले आयुक्त सुनिल पवार, उपायुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शन आणि कर ‍निर्धारक आणि संकलक विनय कुळकर्णी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेले प्रयत्न याचे नक्कीच कौतूक करावे लागेल.
तर महापालिका प्रशासनाने कर भरणा सुलभ होण्यासाठी विहीत वेळेत ‍बिले जनरेट करून पोहच करणे, कराचा भरणा ऑनलाईन होण्यासाठी जनजागृती करणे, डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड/ युपीआय/ बीबीपीएस/गुगल पे/फोन पे/भिम युपीआय/पॉस मशिन /नेट बँकीग इ.द्वारे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच वाणिज्य ‍आस्थापना, ‍निवासी सदनिका आणि ओपन लँड विकासक यांना जप्तीपुर्वीच्या नोटीसा देणे, वाणिज्य आस्थापना सिल करणे आदींचा समावेश आहे.
मालमत्ता कराबरोबरच महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक आणि त्यांच्या कर्मचारी वर्गानेही 66 कोटी 94 लाखांची विक्रमी वसूली केली आहे.

कोविड साथीच्या या कठीण परिस्थितीतही महापालिकेच्या करदात्यांनी करांचा भरणा करुन महापालिकेस केलेल्या सहकार्याबाबत महापालिका करदात्या नागरिकांची आभारी असून सन 2021-22 या आर्थिक वर्षातही करदात्यांनी वर्षाच्या प्रारंभापासूनच शक्यतो ऑनलाईनद्वारे कराचा भरणा करून महापालिकेस असेच सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web