कल्याण डोंबिवलीतील वाढता कोरोना प्रादुर्भाव, केडीएमसीत महत्वाची बैठक

कल्याण प्रतिनिधी– सध्या ज्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहेत त्या वेगाने कोवीड लसीकरण होणे गरजेचे बनले असून केंद्राकडून महाराष्ट्राला होणाऱ्या कोवीड लसींच्या पुरवठ्यामध्ये वाढ होणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.
कल्याण डोंबिवलीतील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात एका संयुक्तिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा पुनरुच्चार केला.
कल्याण डोंबिवलीमध्ये मधल्या काळात लक्षणियरित्या कमी झालेला कोरोना पुन्हा एकदा वेगाने पसरू लागला आहे. याचे प्रमूख कारण म्हणजे लोकांना पुरेशा प्रमाणात लसीकरण होत नाहीये.
वाढते कोरोना रुग्ण पाहता कल्याण डोंबिवलीत कोवीड लसीकरण आणि लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र केंद्राकडून जोपर्यंत लसींचा पुरवठा वाढवला जात नाही तोपर्यंत केंद्र वाढवून काहीही उपयोग नसल्याकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधले. अधिकाधिक लोकांचे लसीकरण करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा केडीएमसीकडे तयार असून लवकरात लवकर लस उपलब्ध होणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असणारे बेड भरू लागले आहेत. त्यामूळे जास्तीचे बेड उपलब्ध होण्यासाठी खासगी रुग्णालयातील बेड पूर्वीप्रमाणे ताब्यात घेण्यासह पाटीदारसारखे मोठे कोवीड सेंटर सुरू करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत वाढते कोरोना रुग्ण, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपलब्ध बेड आणि भविष्यात आवश्यक असणारी बेडसंख्या, कोवीड लसीकरण, लसीकरणाची केंद्र वाढवणे, सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधीना या मोहिमेत समावेश करणे आदी महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.

कोरोनविरोधात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून एकत्रित प्रयत्न आवश्यक – आमदार रविंद्र चव्हाण
वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. लवकरात लवकर यातून सर्वांची मुक्तता करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त दालनात झालेल्या बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते.
तर सध्या कोवीड पेशंट मोठ्या प्रमाणात सापडत आढळत आहेत. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी नविन स्टाफ नियुक्त करा, ज्या भागात जे जे आवश्यक आहेत, जे सेंटर्स पूर्वी सुरू होते किंवा नव्याने काही सेंटर्स लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आपण केली असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वतः जातीने यामध्ये लक्ष घालत असल्याचेही आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, विश्वनाथ राणे, महानगरप्रमूख विजय साळवी, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह कल्याण डोंबिवली महापालिका आरोग्य विभागचे सर्व प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web