दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण वंचितची महिला आयोगाकडे तक्रार,सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून इतर अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत येणाऱ्या हरीसाल येथील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरूवारी आत्महत्या केली. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे माध्यमाद्वारे समोर आले आहे. दीपाली चव्हाण यांच्या सुसाइड नोटमध्ये काही वरीष्ठ अधिकार्‍यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या अनुषंगानेच उपवनसंरक्षक शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अप्पर प्र. मु. व. संरक्षक तथा क्षेत्र संचालक रेड्डी यांच्या नावाने लिहीलेल्या सुसाईड नोट मध्ये दीपाली चव्हाण यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर क्षेत्र संचालक रेड्डी यांनी शिवकुमार विरोधात केलेल्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे महिला अधिका-याचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात रेड्डी देखील दोषी असल्याचे वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोषी असलेल्या सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचीतच्यावतीने करण्यात आली आहे.

गावकरी तसेच मजुरां समोर शिवीगाळ करून आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. शिवाय त्यांनी आपल्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, एकांताच्या ठिकणी बोलवुन अश्लीलन संभाषण केल्याचा आरोप ही दीपाली चव्हाण यांनी केला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांच्याकडे तक्रार केली असता, रेड्डी हे शिवकुमार यांना पाठीशी घालत असल्याचे चव्हाण यांचे म्हणणे होते. केलेल्या कामाचे पैसे न काढणे, सुट्ट्या नाकारणे, न्यायालयाचा निर्णय असताना देखील रुजू न करून घेणे, असे आरोप करण्यात आले आहे.

महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत मेळघाट हे ठिकाण दलदल बनल्याचा आरोप करण्यात आला आहे. मृत महिला अधिकारी दिपाली यांचे आरोप पाहता वन विभाग हे महिला अधिकाऱ्यांचे शारीरिक व मानसिक छळ करण्याचे ठिकाण झाल्याचे दिसून येते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना महिला अधिकारी व कर्मचारी सहज सावज वाटतात. महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवर वरिष्ठ अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याचे दीपाली चव्हाण प्रकरणावरून आता उघड झाले आहे. त्यामुळेच वरिष्ठांच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून दीपाली चव्हाण सारख्या महिला अधिकाऱ्याला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. कामाच्या ठिकाणी महिला अधिकारी, कर्मचारी यांचे लैंगिक शोषण होऊ नये म्हणून वन विभागाने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली दिसून येत नाही. सबब महाराष्ट्रभर वनविभागात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणे गरजेचे आहे.

दीपाली चव्हाण प्रकरणात शिवकुमार व इतर अधिकारी यांच्याबाबत जे गंभीर आरोप करण्यात आले आहे अशा अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच वन विभागाचे सीसीटीव्ही डेटा जप्त करून त्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत
पोलीस महासंचालक व
मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र, वनविभाग सिव्हिल लाइन्स नागपूर यांच्याकडे तक्रारींचे निवेदन देण्यात आले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web