आता केडीएमसी क्षेत्रात फेरीवाले आणि हातगाड्यांना शनिवारी-रविवारी मनाई

कल्याण प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसांपासून सलग 500 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी फेरीवाले आणि हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रीला केडीएमसी प्रशासनातर्फे मनाई करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये आज 593 कोरोना रुग्ण आढळून आले असून दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंताजनक वाढ लक्षात घेता केडीएमसी प्रशासनाने दर शनिवार आणि रविवारी खाद्यपदार्थ- पेयाच्या हातगाड्या, फेरीवाले आणि इतर सर्व प्रकारच्या हातगाड्यांना विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. एरव्ही या सर्वांसाठी सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली असून केवळ प्रत्येक शनिवार आणि रविवारसाठी हा आदेश लागू करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी काढलेल्या आदेशांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या 3 दिवसांत तब्बल दिड हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतरही केडीएमसी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाहीत. त्यामूळे कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही केडीएमसीकडून दिसत असलेला ढिसाळपणा चांगलाच महागात पडू शकतो.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web