केडीएमसी लाचखोरी प्रकरण ७ प्रभाग अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

कल्याण प्रतिनिधी–  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला अनाधिकृत बांधकाम प्रकरणी लाच घेताना पकडल्यानंतर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ७ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या केल्या आहेत. अल्पावधीतच युवा आणि कार्यतत्पर अधिकारी अशी ओळख असणाऱ्या अक्षय गुडधे यांच्यावर हॉटसीट अशी ओळख असणाऱ्या क प्रभाग क्षेत्र कार्यालयाचा पदभार सोपवण्यात आला आहे.
 २ दिवसांपूर्वी कल्याणच्या क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि एका कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. बांधकामाच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी  १५ हजारांची लाच घेताना या दोघांना ठाणे अँटी करप्शनने पकडले होते. या लाचखोरीच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा केडीएमसीची नकारात्मक चर्चा सुरू झाली होती. त्यामूळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अचानकपणे केडीएमसीच्या १० पैकी ७ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या करत एकप्रकारे लाचखोरी कोणत्याही स्वरूपात सहन केली जाणार नसल्याचा संदेश दिला आहे. त्यामूळे आता महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम केडीएमसीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कितपत होतो हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. 

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web