पहलवान साहेब जीवन चरित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई प्रतिनिधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्कसपटू मल्ल भागवत राय यांच्या ‘पहलवान साहेब’ या जीवन चरित्राचे प्रकाशन करण्यात आले. वर्षा या शासकीय निवासस्थानी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे जीवन चरित्र भागवत राय यांचे नातू आणि मुंबई क्षेत्रीय पारपत्र अधिकारी मनोज कुमार राय यांनी लिहिले आहे.

‌दिवंगत भागवत राय ताकदीचे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध होते. स्वातंत्र्यपूर्व काळात राय यांनी १९२५ मध्ये सर्कस कंपनी स्थापन केली होती. सर्कशीतून भागवत राय हत्तीला छातीवर उभे करून लोकांशी संवाद साधणे, धावती मोटार कार रोखणे, सुमारे तीन क्विंटल दगडाचा भार छातीवर तोलून धरणे असे ताकदीचे प्रयोग योग आणि प्राणायम यांच्याद्वारे लीलया करून दाखवत असत. सर्कसपटू भागवत राय यांचे हे जीवन चरित्र बारा प्रकरणात विभागले आहे. यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयीचे विविध पैलू उलगडून दाखवण्यात आले आहेत.

प्रकाशनप्रसंगी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पुस्तकाचे लेखक श्री.राय, श्री.मिलिंद नार्वेकर, मुंबई क्षेत्रीय पारपत्र कार्यालयातील अधिकारी जयंत कुमार सावो, जॉन मार्क, श्रीमती संगीता राय, लेखक प्रणव वत्स आदी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web