कोरोना निर्बंधांबाबत केडीएमसी आयुक्तांची कल्याण डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी घेतली भेट

कल्याण प्रतिनिधी– वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांबाबत या दोन्ही शहरांतील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. कोरोना निर्बंधांमध्ये डोकेदुखी ठरणाऱ्या पी1 आणि पी2 च्या निर्णयाचा महापालिका आयुक्तांनी फेरविचार करण्याच्या मागणीसह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केडीएमसी प्रशासनाकडून दुकाने, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंटसाठी लागू करण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधांतील काही नियमांवरून केडीएमसी विरुद्ध दुकानदार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मग ती दुकाने बंद करण्याची वेळ असो की पी1 -पी2 नूसार दुकाने बंद ठेवायचा निर्णय. या दोन्ही मुद्द्यांवरून सध्या कल्याण डोंबिवलीतील व्यापारी आक्रमक झालेले आहेत. शुक्रवारीही केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी व्यापाऱ्यांची शिष्टमंडळाची बैठक घेतली होती. मात्र ती कोणत्याही तोडग्याविनाच झाल्याचे दिसून आले.
त्यामूळे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज कल्याण डोंबिवलीतील दुकानदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना बोलावले होते. ज्यामध्ये पी1-पी2 चा निर्णय रद्द करावा, दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी अशा दोन महत्त्वाच्या मागण्या आम्ही मांडल्याची माहिती राकेश मुथा यांनी एलएनएनशी बोलताना दिली. तसेच पी1-पी2 ऐवजी आठवड्यातून एक दिवस सर्वच दुकाने बंद ठेवण्यासाठी निश्चित करण्याची सूचनाही दुकानदार-व्यापारी वर्गाने केल्याचे मुथा यांनी सांगितले.
दरम्यान व्यापारी वर्गाचे म्हणणे ऐकून घेत पी1 पी2 आणि दुकानांची वेळ वाढवून देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे सकारात्मक आश्वासन दिल्याचे व्यापाऱ्यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले.
यावेळी राकेश मुथा, दिनेश गौर, भरत मोटा, दिलीप कोठारी यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील विविध व्यापारी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web