भिवंडी कल्याण शील रस्त्याचे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मनविसेनेची मागणी

भिवंडी प्रतिनिधी– भिवंडी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची होत असल्याच्या तक्रारी होत असतानाच आता भिवंडी कल्याण शील या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा व मनमानी कारभार केला असून या रस्त्याचे काम देखील निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष परेश चौधरी यांनी केला असून रस्त्याचे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी देखील चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सोनटक्के यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या निकृष्ठ कामाचे पुरावे देखील चौधरी यांनी मुख्य अभियंता यांना दिले आहेत मात्र तरी देखील ठेकेदारावर कोणतीच कारवाई होत नसल्याने मनविसेना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे .              

भिवंडी कल्याण शीळ या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने सदर महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु आहे. या रस्त्यावरून कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, उल्हासनगर तसेच मुरबाड येथे जाण्याकरीताचा एकमेव व महत्वाचा तसेच मुख्य रस्ता असून हजारो हलक्या व अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून होत असते . भिवंडी-कल्याण-शिळ सहापदरी सिमेंट कॉक्रीटचा रस्ता बनविण्यात येत असून लॉकडाऊनच्या काळात देखील हे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. परंतु या काळात तयार करण्यात आलेला रस्ता निकृष्ठ दर्जाचा असल्याची तक्रार मनविसेनेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी केली असून. मे,साकेत इन्फ्रा ह्या कंपनीच्या माध्यमातून कमी दर्जाचे सिमेंट काँक्रेट या रस्त्याच्या कामासाठी वापरले जात असून ठिकठिकाणी रस्त्याला तडे जायला सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे भिवंडी बायपास येथे असलेल्या टाटा आमंत्रा या निवासी संकुलनासमोर ठेकेदाराने चक्क मातीवरच रेडी मिक्स सिमेंट टाकून रस्ता बनवला असल्याचे पुरावे देखील चौधरी यांनी रस्ते विकास महामंडळाला सादर केले आहेत . रस्ता बनवितांना शासकीय नियमांचे उल्लंघन ठेकेदाराने केले असून यासंदर्भात आपण वेळोवेळी शासकीय व जबाबदार अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी करत असूनही त्या तक्रारींकडॆ आजही दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात या रस्त्याच्या निकृष्ठ कामा बाबत व ठेकेदारावर कारवाई व्हावी तसेच संबंधित कामाची आयआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा आपण भिवंडी बायपास येथे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनविसेनेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी दिली आहे .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web