डोंबिवलीत बैलाचा वाढदिवस साजरा, बैल मालकावर गुन्हा दाखल

डोंबिवली प्रतिनिधी– कल्याण डोंबिवलीत दिवसागणिक कोरोनाचे आकडे वाढत चालले असले तरी दुसरीकडे लोकांमधील निष्काळजी आणि बेजबाबदारपणा काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. वाढदिवस, लग्न, हळदी समारंभांच्या पार्ट्यांनंतर आता डोंबिवलीमध्ये चक्क बैलाचा जंगी वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आधी मोठ्या थाटामाटात वाढदिवस, मग शाही विवाह सोहळा आणि आता चक्क वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन तेही बैलाचे. हो एकदम बरोबर वाचले. डोंबिवलीमध्ये एका बैलाचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात आणि फटाक्यांच्या जल्लोषात साजरा करण्यात आला. डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर रोड परिसरात हा प्रकार घडला आहे. बरं यामध्ये सध्याचे कोरोना नियम पाळून, मास्क लावून, सोशल डिस्टन्स ठेऊन हे सेलिब्रेशन झालं असतं तर मग काही प्रश्नच नव्हता. पण नाही ना याठिकाणी ना सोशल डिस्टन्स होते ना अनेकांच्या तोंडावर मास्क. मग काय…? महाराष्ट्र कोवीड कलम, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंध अधिनियमांतर्गत संबंधित बैलाच्या मालकावर विष्णूनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवलीत कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरवण्याच्या परिस्थितीत आहे. त्यामूळे तुमचे लग्न असो हळद असो की वाढदिवस समारंभ. ते तुमच्यासह इतरांचा जीव धोक्यात घालणार असतील तर मग काय अर्थ आहे..? याची आपण सर्वांनी जाण ठेवून पुनः एकदा जबाबदारपणे वागण्याची गरज निर्माण झाली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web