कल्याण पूर्वेत लग्न समारंभात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

कल्याण प्रतिनिधी- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पालिका आयुक्तांनी अनेक निर्बंध लावले आहेत. असे असतांना देखील  लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन करून गर्दी जमविणाऱ्यांविरोधात महापालिकेने गुन्हा दाखल केला असून हि घटना कल्याण पूर्वेत घडली आहे.

कल्याण पूर्वेतील ६०  फुटी रोड, गॅस कंपनी शेजारी येथे बुधवारी संध्याकाळी संपन्न होत असलेल्या लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असल्याची माहिती ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांना मिळाली. हि माहिती मिळताच त्यांनी आणि त्यांच्या पथकाने पाहणी केली असता, या विवाह समारंभात  सुमारे ७०० लोकं उपस्थित असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे त्यांनी सोशल डिस्टन्ससिंगचे पालन न करणे, तोंडाला मास्क न लावणे अशा प्रकारचे बेजबाबदार पणाचे वर्तन करून कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.  

यामुळे या विवाह सोहळ्याचे आयोजक यांच्या विरुद्ध भा.द.वि. कलम १८८, २६९, २७० आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१,  तसेच कोविड-१९ उपाययोजना नियम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कल्याण  डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना न चुकता मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणेया त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web