महाकृषी ऊर्जा अभियानात सक्रिय सहभागी महिला सरपंच व महिला ग्राहकांचा सन्मान

कल्याण प्रतिनिधी – महावितरणच्या कल्याण परिमंडलात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून इतरांना प्रोत्साहित करणाऱ्या महिला सरपंच, महिला ग्राहक व महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. महिलांच्या सक्रिय सहभागातून अभियानाला बळ व गती मिळाल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी यावेळी केले. 

चालू वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना थकबाकीवर ६६ टक्क्यांपर्यंत सूट तसेच पैसे भरून प्रलंबित शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी राज्य सरकारने कृषिपंप धोरण-२०२० आणले असून या धोरणांतर्गत महाकृषी ऊर्जा अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांना योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या महिला सरपंच लता सिंगवे (वशिंद), वनिता मुखणे (लेनार्ड), सुमन हिलम (कळंबे), भारती मोंडूला (असनोली), भीमाबाई मुकणे (गेगाव), रेशमा डोंगरे (खुटघर) आणि स्वाती जाधव (खडकवली बेहरे) यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला. तर या योजनेत सहभागी होऊन थकीत वीजबिलात पन्नास टक्के सवलत मिळवून थकबाकीमुक्त झालेल्या महिला कृषिपंप ग्राहकांना प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणाऱ्या महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही यावेळी मुख्य अभियंता अग्रवाल यांनी सन्मान केला. 

याप्रसंगी अधीक्षक अभियंता सुनील काकडे, सिद्धार्थ तावाडे, प्रवीण परदेशी, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा यांच्यासह महिला कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभियंता उमा बारिगिडद, अनिता चौधरी, स्मिता पेवेकर, शिल्पा दडपे, स्मिता काळे, आचल तायडे आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्राची ठकरे यांनी केले व उमा निपाणे यांनी आभार मानले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web