कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर कष्टकरी महिलाचा सन्मान करुन महिला दिन साजरा

कल्याण प्रतिनिधी -आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एकीकडे पंचतारांकित ठिकाणी विविध सोहळे होत असताना कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर झालेला ‘महिला दिना’चा सोहळा या सर्वांपेक्षा वेगळा ठरलेला पाहायला मिळाला.
कल्याणचे डम्पिंग ग्राऊंड हे इतर नागरिकांसाठी हा केवळ कचऱ्याचा ढिगारा असला तरी कष्टकरी महिलांसाठी मात्र त्यांच्या उपजीविकेचे प्रमूख साधन आहे. अनेक महिला या कचऱ्यावरच आपला संसाराचा गाडा खेचतात, मुलांचे पालन पोषण करत असतात. मात्र समाजामध्ये कष्टकरी महिलांच्या वाट्याला समाजामध्ये तितकेसे कौतूक, सन्मान आणि प्रेमाचे शब्द येताना अजिबात दिसत नाही.
नेमकी हीच उणीव भरून काढण्यासाठी कल्याणातील ‘अनुबंध’ या सामाजिक संस्थेतर्फे आज कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवर अनोख्या महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या महिलांचा अनुबंध संस्थेतर्फे छोटेखानी सत्कार करत त्या करत असणाऱ्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
आजच्या दिवशी समाजातील पुढारलेल्या महिलांचा, आपल्या कर्तृत्वाचा आणि कार्याचा झेंडा रोवणाऱ्या महिलांचा विविध संस्थांकडून सन्मान कौतुक केले जाते. मात्र समाजातील प्रगतीशील महिलांच्या घरी राबणाऱ्या, धुणी-भांडी करणाऱ्या कष्टकरी महिलांची कोणालाही दखल घ्यावीशी वाटत नाही. त्यासाठीच आम्ही अनुबंध संस्थेतर्फे अशा महिलांचा सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याची माहिती विशाल जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तर या अनपेक्षित कौतुक सोहळ्याने कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुललेले हसू आणि आभाळाएव्हढे मानसिक समाधान दिसत होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web