जागतिक महिला दिनी होणार राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई प्रतिनिधी– राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने येत्या जागतिक महिला दिनी दि. 8 मार्च, 2021 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास, कोकण विभागाच्या विभागीय उप-आयुक्तांनी दिली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती अनिता पाटी (भा.व.से) यांचे हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.

महिला व बालविकास विभागाने राज्यातील महसूली विभागस्तरावर राज्य महिला आयोगाची कार्यालये स्थापन करण्यासंदर्भात दि. 10 फेब्रुवारी, 2021 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार हे कोकण विभागीय कार्यालय विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, कोकण विभाग, सदनिका नं.05/06, शांती बिल्डींग, बी- विंग, विश्वधन को-ऑप. हौ. सोसा. लिमिटेड, सर्वोदय पार्श्वनाथनगर, जैन मंदीर रोड, मुलूंड (पश्चिम), मुंबई-400080, दूरध्वनी क्र.022-25917655, ईमेल आय.डी. mswcdkwcd2021@gmail.com येथे सुरु करण्यात येत आहे.

या कार्यालयाच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर व सिंधुदुर्ग या कोकण विभागातील सातही जिल्ह्यांमध्ये महिलांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण होण्याच्या दृष्टीने काम केले जाईल. त्यानुसार महिलांना त्यांच्या इच्छेनुसार तज्ज्ञ समुपदेशकांमार्फत समुपदेशन केले जाईल किंवा स्थानिक पोलीस स्टेशनकडून सहकार्य घेण्यात येईल. अतिमहत्त्वाच्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी किंवा स्वाधिकारे (Suo moto) नोंद घ्यावयाच्या तक्रारींबाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येईल. आयोगाच्या विभागीय कार्यालयाद्वारे प्रस्तावित/नियोजित सुनावण्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील.

तरी कोकण विभागातील विविध प्रकारच्या अत्याचाराने पीडित असलेल्या महिलांनी व अशा महिलांना मदत करु इच्छिणाऱ्यांनी वरील ठिकाणी दूरध्वनीद्वारे अथवा mswcdkwcd2021@gmail.com या ईमेल आयडीवर अथवा शक्य असल्यास प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहनही कोकण विभागाचे विभागीय उप-आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web