भिवंडीत आदिवासी घरे तोडण्याची नोटीस बजावणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा

भिवंडी प्रतिनिधी – भिवंडी तालुक्यातील ३३ गावांमध्ये वनखात्याच्या जमिनी वरील आदिवासी कुटुंबियांच्या तब्बल तीन हजार घरांना वनविभागाने घरे मोकळी करून जागा वनखात्याच्या ताब्यात द्यावी अन्यथा कारवाई केली जाईल अशी अन्यायकारक नोटिसा बजाविल्याने या विरोधात श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली भिवंडी वनक्षेत्रपाल कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला होता . या मोर्चा मध्ये भिवंडी तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी स्त्री पुरुष सहभागी झाले होते.आदिवासी कुटुंबियांना दिलेल्या नोटीस तात्काळ मागे घ्या ,आदिवासी कुटुंबियांना बेघर करून त्यांना भयभीत करणाऱ्या वन अधिकाऱ्यां विरोधात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा ,आदिवासींच्या रहीवाशी असल्या बाबतचे पुरावे वनविभागाने गोळा करावेत अशा मागण्या घेऊन बस स्थानकातून सुरू झालेल्या या मोर्चाचे वनपरिक्षेत्र कार्यालयात सभेत रूपांतर झाले त्या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर,उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर, सुनील लोणे,प्रमोद पवार,दशरथ भालके,संगीत भोमटे,जया पारधी,आशा भोईर,सागर देसक,मोतीराम नामखुडा यांच्या नेतृत्वा खाली पार पडलेल्या या सभेत अनेकांनी मार्गदर्शन करताना वनविभागाच्या अरेरावी कार्यपद्धतीचा पाढा वाचून या पुढे ही अरेरावी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला .         

त्यानंतर उपविभागीय वन अधिकरी श्रीमती देसाई,भिवंडी वनपरिक्षेत्र अधिकरी संदीप आरदेकर यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली व सर्व नोटीस प्रकरणांची शहानिशा करून कोणाही आदिवासी कुटुंबियांना बेघर होऊ दिले जाणार नाही असे आश्वासन मिळाल्यानंतर या मोर्चाची सांगता झाली .दरम्यान शांतीनगर पोलिसांनी या मोर्च्यास परवानगी दिली नसतानाही बेकायदेशीर मोर्चा काढल्या प्रकरणी आयोजक भिवंडी शहर पदाधिकारी सागर देसक ,मोतीराम नामखुडा यांना १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात अली आहे .         

शासन एकीकडे जमीन घरे असलेल्यांच्या नावे करण्या बाबत आदेश काढत असताना वन विभाग आदिवासी कष्टकरी समाजाला बेघर करण्याचा घाट घालीत असल्याचा आरोप करीत श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केला असून शेकडो आदिवासी स्त्री पुरुषांनी भिवंडी वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढून या नोटीस बाबत जाब विचारला .स्थानिक शांतीनगर पोलीस ठाणे यांनी मोर्चाला परवानगी नाकारली असताना , बेघर होऊन मरण्या पेक्षा मोर्चा काढुन पोलिसांच्या लाढया खाऊन मरण पत्करू अशी भूमिका घेत हा मोर्चा काढला असल्याची प्रतिक्रिया सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web