एसएनडीटी एमएससी क्लिनिकल पोषण आणि आहार तज्ज्ञ प्रयोगशाळेचे उद्घाटन

मुंबई प्रतिनिधी – एसएनडीटी महिला महाविद्यालयात महिलांना केवळ रोजगार मिळविण्यासाठी शिक्षण दिले जात नाही तर त्याद्वारे महिलांचे सबलीकरण करण्याचे कार्य केले जाते. त्यांना उच्च शिक्षणासाठी आधुनिक संसाधने पुरविणे ही अभिनंदनीय बाब असून महिलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी शासन सकारात्मक असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

पुण्याच्या एसएनडीटी महाविद्यालयाच्या होम सायन्स शाखेच्या एमएससी क्लिनिकल पोषण आणि आहार तज्ज्ञ या प्रयोगशाळेचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे उपसभापती डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते झाले.

उपसभापती डॉ.गोऱ्हे  म्हणाल्या, महाविद्यालयातील होम सायन्स विषयातील विद्यार्थिनी देशभर नव्हे तर जगभर कार्यरत आहेत. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींसाठी एमएससी क्लिनिकल पोषण आणि आहार तज्ज्ञ प्रयोगशाळा भविष्यात नक्कीच लाभदायक ठरणार आहे. मनुष्याच्या बुद्धीचे आणि शारीरिक पोषण उत्तम राहण्यासाठी या प्रयोगशाळेचे काम भविष्यात उपयुक्त ठरेल. ‘एसएनडीटी’स भविष्यातही शैक्षणिक कामांसाठी संपूर्ण सहकार्य राहील. अन्न सुरक्षा व सुधारित पोषण आहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे या अनुषंगाने काम करताना बाल व माता मृत्यू कमी करण्यासाठी उत्तम पोषण आहार तयार करण्यासाठी एसएनडीटीच्या प्रयोगशाळेने पुढाकार घेण्याचे आवाहनदेखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास माजी प्राचार्य एफ.झेड तारापोर, एसएनडीटी महाविद्यालयाच्या डॉ.मुक्तजा मठकरी, डॉ.अर्चना विश्वनाथन, डॉ.नलिनी पाटील, प्राध्यापक श्री. जुमाले, प्राध्यापक श्री. कुलकर्णी आदींसह महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थिनी आणि स्त्री आधार केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबादचे प्रवीणा वालेकर यांनी या प्रयोगशाळेस अर्थसहाय्य केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web