राज्यभर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता मी जबाबदार मोहीम

मुंबई प्रतिनिधी- मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली. गर्दी वाढत असून  राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही ते म्हणाले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित करीत होते. संसर्ग रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, जिथे जिथे आवश्यकता  असेल तिथल्या जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश आपण दिले आहेत.

कोविड  परिस्थितीत आपल्याला जनतेशी या माध्यमातून संवाद करताना समाधान मिळते आणि आपण देखील मला परिवाराचा एक सदस्य म्हणून माझे ऐकता असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील ८ दिवसांत जनतेने करायचा आहे असे सांगितले. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे त्यांनी  मास्क घालू नये आणि आरोग्याची कुठलीही शिस्त पळू नये असेही ते म्हणाले.गेले वर्षभरापासून आपण कोरोनाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय , त्यात आपल्याला यशही आले . मुंबईत आपण दिवसाला ३०० ते ४०० रुग्ण संख्येपर्यंत खाली उतरलो मात्र आता काही दिवसांपासून ८०० ते ९०० रुग्ण आढळत आहेत. राज्यातही दररोज हजार ते दीड हजार रुग्ण वाढताहेत, आज दिवसभरात सुमारे ७ हजार रुग्ण आढळले ही  चिंताजनक बाब आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडे सुविधा नव्हत्या, ऑक्सिजन, बेड्स, रुग्णालये, प्रयोगशाळा पुरेशा नव्हत्या. पण आता सुविधांनी आपण सज्ज आहोत मात्र आता वाढत चालवलेला संसर्ग आपण थांबविला नाही तर या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येईल. एकीकडे आपण सगळॆ खुले करून अर्थचक्राला गती देत आहोत, लोक बिनधास्तपणे नियम मोडून फिरताहेत आणि दुसरीकडे आपण प्रशासन आणि एकूणच यंत्रणेला चाचण्या आणि रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क वाढविण्यास सांगतो आहोत हे बरोबर नाही.

सामाजिक जबाबदारी ठेऊन वागणे महत्त्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा विवाहाचा स्वागत सोहळा रद्द करून भान ठेवले यासाठी त्यांचे अभिनंदन केले. पाश्चिमात्य देशात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे त्या ठिकाणी मोठे निर्बंध टाकण्यात आले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की सर्व काही खुले करा म्हणून नियम मोडून आंदोलने करणारे आता जेव्हा संसर्ग पसरतोय तेव्हा वाचवायला येणार नाहीत. सध्या कोविड योद्ध्यांचे सत्कार सुरु आहेत. या योध्यांनी जीवावर उदार होऊन लढाई केली आहे, मात्र त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने आपण कोविड पसरविणारे कोविडदूत बनू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी झाली, आपण संसर्गाला रोखलेसुद्धा. पण त्यावेळी बहुतेक सर्व जण आपापल्या घरांत होते. आता आपण सर्व काही खुले केले आहे, आपण सर्व बाहेर आलो आहोत  त्यामुळे मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात सतत धूत राहणे ही  आपली व्यक्तिगत जबाबदारी असून ती सर्वानी पार पाडण्यासाठी ‘मी जबाबदार’ ही  मोहीम सुरु करीत आहोत असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

कोविडची जोरदार साथ असताना देखील महाराष्ट्र थांबला नाही. २ लाख कोटींपर्यंत गुंतवणूक महाराष्ट्राने आणली. एमएमआरडीएच्या काही प्रकल्पांना सुरुवात झाली, पर्यटन असो किंवा कृषी क्षेत्र असो आपण विकासाची कामे सुरूच ठेवली. भूमिपूजने झाली, कृषी पंपांना वीज दिली, मी विदर्भात, मराठवाड्यात येऊन गेलो , जव्हारला भेट दिली. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग १ मे पासून नागपूर-शिर्डी वाहतुकीस सुरु करतो आहोत. कामे थांबणार नाही मात्र आता गर्दी करून याचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत तर ती ऑनलाईनच करण्याचे म्हणजे संसर्गाला आमंत्रण मिळणार नाही यादृष्टीने मी सूचना दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधानांसमवेत नीती आयोगाच्या बैठकीत आपण कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत धोरण असावे अशी मागणी केली असून याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी आज केला.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web