भिवंडीतील भुयारी गटर योजनेचा नियोजन शून्य कारभार; नळ कनेक्शन तोडल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण

भिवंडी प्रतिनिधी- भिवंडी महापालिकेची भुयारी गटर योजना नेहमीच चर्चेत येत असून या गटर योजनेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे. या भुयारी गटर योजनेच्या ठेकेदाराने शहरात ठिकठिकाणी खोदकाम केल्याने शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची वाताहात झाली असून शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

त्यातच आता शहरातील शांतीनगर भाजी मार्केट परिसरात भुयारी गटर योजनेचे काम करतांना करण्यात आलेल्या खोदकामाने येथील सुमारे ५० ते ६० परिवारांचे नळ कनेक्शन ठेकेदाराने तोडले आहे. मागील पंधरा दिवसांपासून ठेकेदाराने हे तोडलेले नळ कनेक्शन पुन्हा जोडले नसल्याने येथील राहिवासींना ठेकेदाराच्या हलगर्जी कारभारामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मागील चार दिवसांपासून तर येथील राहिवासींना तोडलेल्या नळ कनेक्शनमुळे पिण्याच्या पाण्याला मुकावे लागले असल्याने येथील नागरिक मनपासह भुयारी गटर योजनेच्या ठेकेदारावर कमालीचे नाराज झाले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून तोडलेल्या या नळ कनेक्शनकडे मनपा प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष जात नसल्याने येथील महिला वर्गाकडून मनपा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून येत्या दोन दिवसात येथील तोडलेले नळ कनेक्शन ठेकेदार अथवा मनपा प्रशासनाने जोडले नाही तर महापालिकेच्या मुख्यालयावर महिला व नागरिक हंडा मोर्चा काढतील असा इशारा येथील रहिवासी यांनी दिला आहे.                  

विशेष म्हणजे गटर योजनेचे काम करतांना नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी व समस्या होणार नाहीत याची खबरदारी संबंधित ठेकेदाराने घेणे गरजेचे असल्याच्या लेखी सूचना मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी ठेकेदारांना वेळोवेळी देऊनही संबंधित ठेकेदार मनपा आयुक्तांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून शांतीनगर भाजी मार्केटपरिसरातील नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवत असल्याने मनपा आयुक्त या ठेकेदारांवर कारवाई करणार का याकडे शांतीनगर परिसरातील नावरीकांसह संपूर्ण शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web