कल्याण पूर्वेत शिवजयंती उत्सवात कोरोना योद्धांचा कृतज्ञता सन्मान पत्र देउन गौरव

कल्याण प्रतिनिधी –सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात कोरोना कालावधीत जनसामान्यांच्या जिवाची काळजी घेण्यासाठी स्वःताच्या जिवाची पर्वा न करता  प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ज्या शासकीय सेवेतील व्यक्तींनी मोलाचे असे कार्य केले आहे अशा व्यक्तींचा ‘ ‘कृतज्ञता सन्मान पत्र ‘ गुलाब पुष्प आणि ऐतिहासीक पुस्तक देऊ सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्या वाढत्या धोक्याची चाहूल लक्षात घेता मर्यादीतच निमंत्रितांच्या उपस्थितीत तिसाई देवी मंदीराच्या प्रांगणात शुक्रवारी  या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान भोईर तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केला. त्या नंतर बासरीवाला ढोल पथकाने तालबद्ध गजरात महाराजांना मानवंदना दिली. याच दरम्यान समारंभ स्थळी आगमन झालेल्या महाराजांच्या पालखीचे ‘मानवी पाय घड्या’ घालुन जल्लोषात स्वागत करण्यात आले. या समयी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावातील एका शिवप्रेमीने शिवाजी महाराजांचे मनोगत व्यक्त करतांना या युगाबाबत शिवाजी महाराजांच्या मनातील  भावना  कथन केल्या.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहू राजे साळवे, प्रभाग ५ ड चे प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, प्रभाग ४ जे चे प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील व त्या त्या क्षेत्रातील प्रमुखांच्या प्राथिनिधिक उपस्थितीत पोलिस कर्मचारी, सफाई कामगार, डॉक्टर्स, नर्सेस यांचा नावांसह छापाई केलेले ‘कृतज्ञता  सन्मान पत्र ‘ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर कोरोना कालावधीत वृत्त पत्रांची काही काळ छपाई आणि वितरण बंद असतांनाही कोरोना संदर्भातील योग्य ती माहीती आणि जनजागृतीचे काम दृकश्राव्य आणि समाज माध्यमातून जन सामान्यांपर्यंत पोहचवीण्याचे काम करणाऱ्या प्रिन्ट आणि इलेक्ट्रानिक मिडीयातील पत्रकारांचाही कृतज्ञता सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनीही भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून त्यांना वंदन केले. शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान भोईर, विद्यमान अध्यक्ष रुपेश गायकवाड, कार्याध्यक्ष अभिमन्यु गायकवाड, सचिव राजेश अंकुश  तसेच विश्वस्त मंडळाचे सदस्य नरेंद्र सुर्यवंशी,  वसंतराव सुर्यवंशी,  अनिल घुमरे,  के. एल. वासनकर यांच्यासह जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड,  ग्रामस्त पंच कमिटीचे सुनिल गायकवाड, परिवहन सदस्य संजय मोरे, सुभाष म्हस्के,  सेवा निवृत्त पोलिस अधिकारी जगदीश लोहळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web