कल्याण परिमंडलात नव्या धोरणातून कृषिपंपाच्या १३ टक्के थकबाकीचा भरणा तर ७१ कृषिपंपांना नवीन वीज जोडण्या

कल्याण प्रतिनिधी – कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकीत पन्नास टक्के सवलत व नवीन वीजजोडणीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२०’ला कल्याण परिमंडलात वाढता प्रतिसाद मिळत आहे. भेंडीचे आगार म्हणून ओळख असलेल्या खांडपे गावात (ता.मुरबाड) गुरुवारी अकरा शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या चालू बिलासह थकबाकीची २ लाख ७२ हजार रक्कम रोख स्वरूपात मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्याकडे सुपूर्द केली.  तर या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत चालू बिलासह एकूण थकबाकीपैकी १३ टक्के थकबाकीचा भरणा झाला असून सर्वच शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करून घेण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

कल्याण परिमंडलात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकूण २३ हजार ५८९ कृषिपंप ग्राहक असून त्यांच्याकडे २८ कोटीचें वीजबिल थकीत आहे. योजनेतील तरतुदींमुळे एकूण थकबाकीपैकी २ कोटी २१ लाख रुपये माफ झाले आहेत. आता परिमंडलातील शेतकऱ्यांकडे २५ कोटी ७७ लाख रुपयांच्या एकूण थकबाकी आहे. त्यापैकी केवळ पन्नास टक्के म्हणजेच १२ कोटी ८८ लाख रुपये चालू वीजबिलासह एकरकमी भरल्यास उर्वरित पन्नास टक्के थकबाकी माफ होणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत चालू वीजबिलासह थकबाकीच्या २ कोटी ३५ लाख रुपयांचा भरणा करून महावितरणला तत्पर प्रतिसाद दिला. याशिवाय मार्च-२०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या दोन्ही जिल्ह्यातील ७१ कृषिपंपांना या योजनेतून नवीन वीज जोडणी देण्यात आली.

खांडपे येथे आयोजित मेळाव्यात अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे, कार्यकारी अभियंता राजीव रामटेके, उपकार्यकारी अभियंता सुरेश सुराडकर यांनीही योजनेबाबत माहिती देऊन सहभागी होण्याचे आवाहन केले. तर सरपंच अक्षता वाघचौरे व उपसरपंच रवींद्र रसाळ यांनी गावातून वसूल होणाऱ्या कृषिपंप थकबाकीतील ३३ टक्के रक्कम गावातील वीज वितरण यंत्रणेवर खर्च होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच खांडपे ग्रामपंचायतीला थकबाकी वसुली केंद्र म्हणून मंजुरी व त्यातून मिळणारे उत्पन्न याचाही मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खांडपे पंचक्रोशीतील कृषिपंप ग्राहक, ग्रामस्थ, महावितरणचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web