२२ फेब्रुवारीला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन

सोलापूर प्रतिनिधी– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा सोळावा दीक्षांत समारंभ सोमवार, दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम ऑनलाईन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या समारंभास सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने होत आहे. पदवीधारकांना घरी राहूनच पदवी प्राप्त होणार आहे. विद्यापीठात प्रातिनिधीक स्वरुपात चार विद्यार्थ्यांना सुवर्णपदके तर चार विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदव्यांचे वितरण ऑनलाइन पद्धतीने राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते केले जाणार आहे. प्रत्येक विद्याशाखेतील सीजीपीएनुसार अधिक गुण घेतलेल्या एका विद्यार्थ्यास असे एकूण चार जणांना सुवर्णपदके देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक विद्याशाखेतील प्रथम पीएचडी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना या समारंभात प्रातिनिधिक स्वरूपात पदवी देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. याच समारंभात विद्यापीठाच्या जीवनगौरव व इतर पुरस्कारांचेही वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

52 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व 51 जणांना पीएचडी
यंदा एकूण 52 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन विद्यापीठाकडून सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये 45 मुलींचा तर सात मुलांचा समावेश आहे. तर यंदाच्या वर्षी 51 जणांनी पीएचडी पदवी संपादन केली आहे. यामध्ये 34 विद्यार्थ्यांचा तर 17 विद्यार्थिनींचा समावेश असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शाह यांनी सांगितले. पदवी प्रमाणपत्रासाठी यंदा 20 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्याचे प्रिंट विद्यापीठात जमा करावयाचे आहे आहे. पदवीधारकांना https://youtu.be/IzIVViwztSk या युट्युब लिंकवरून दीक्षांत सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही लिंक देण्यात आली आहे.

यंदा बाराबंदीचा गणवेश
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी बहाल करणारे मान्यवर व पदवी ग्रहण करणार्‍या स्नातकांना आता बाराबंदीचा गणवेश राहणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्थानिक संस्कृती व परंपरा जपणार्‍या ब्रँडचा विचार करून समितीच्या बैठकीत बाराबंदी गणवेशाचा निर्णय घेतल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. यानुसार राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्यासाठीही बाराबंदीचा गणवेश राजभवनला पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी फिकट केशरी रंगाचा गाऊन दीक्षांतचा गणवेश होता.

कोविडमुळे मार्चच्या शेवटी मिळणार प्रमाणपत्र
कोविड-19 संकटामुळे सुवर्णपदक आणि पीएचडी पदवी व्यतिरिक्त इतर सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वाटप मार्च-2021 च्या शेवटच्या आठवड्यात केले जाणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शाह यांनी दिली.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web