भक्तीभाव व समर्पणाने निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी

कल्याण प्रतिनिधी– निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली महाराष्ट्राचा ५४वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २६, २७ व २८ फेब्रुवारी, २०२१ रोजी व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात येत आहे.कोरोना व्हायरसचे संक्रमण अजूनही पूर्णपणे थांबलेले नाही ही बाब लक्षात घेऊन भारत सरकारने कोविड-१९ च्या संदर्भात जारी केलेल्या दिशा-निर्देशांना अनुसरुन समागमाचे आयोजन व्हर्च्युअल रूपात करण्यात येत आहे. 

      मिशनच्या सेवादारांकडून मागील दिड महिन्यापासून या संत समागमाची जय्यत पूर्वतयारी मोठ्या भक्तीभावाने व समर्पणाने संत निरंकारी सत्संग भवन, चेंबूर, मुंबई येथे केली जात आहे. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात समागमात भाग घेणारे वक्ता, गीतकार, गायक, कवि, संगीतकार तसेच वादक यांनी अगोदरच या भवनमध्ये येऊन आपल्या प्रस्तुती सादर केलेल्या असून व्हर्च्युअल रूपात प्रसारण करण्यासाठी त्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागातील तसेच जवळपासच्या राज्यातील आणि देश-विदेशातील कित्येक वक्त्यांनी या समागमामध्ये भाग घेतला आहे. 

      समागमाच्या पूर्वतयारी दरम्यान कोविड-१९ संदर्भात सरकारकडून देण्यात आलेल्या दिशा-निर्देशानुसार सोशल डिस्टंसिंग, मास्क परिधान करणे (दोन गजाचे अंतरमास्क घालणे जरुर), सॅनिटाईजेशन इत्यादि काळजी घेण्याबरोबरच समागम सेवांमध्ये संलग्न आणि कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या सर्व प्रतिनिधींची कोविड  चाचणीही करण्यात आली जेणेकरुन सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे. 

      मिशनच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे, की यावर्षी ५४वा वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित केला जात आहे. निरंकार प्रभुच्या इच्छेला सर्वोपरी मानत हर्षोल्लासाने भक्तगण याचा स्वीकार करत आहेत. संपूर्ण समागमाचे व्हर्च्युअल प्रसारण मिशनच्या वेबसाईटवर दिनांक २६, २७ व २८ फेब्रुवारी, २०२१ रोजी प्रस्तुत करण्यात येईल. याशिवाय, हा समागम संस्कार टी.वी. चॅनलवर तिन्ही दिवशी सायंकाळी ५ ते रात्री ९  वाजेपर्यंत प्रसारित केला जाईल. 

      निरंकारी संत समागमांच्या श्रृंखलेवर जर एक नजर टाकली तर महाराष्ट्राचा पहिला समागम १९६८ मध्ये शिवाजी पार्क, मुंबई येथे बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन सान्निध्यात संपन्न झाला व त्याबरोबरच समागमांची ही अविरत श्रृंखला सुरु झाली. १९८० पर्यंत बाबा गुरबचनसिंहजी यांच्या छत्रछायेखाली हे समागम होत आले आणि त्यानंतर सलग ३६ वर्षे बाबा हरदेवसिंहजी यांच्या कृपाछत्राखाली ही परंपरा पुढे नेण्यात आली. त्यानंतर २ दोन वर्षे हे समागम सद्गुरु माता सविन्दर हरदेवजी यांच्या पावन सान्निध्यात संपन्न झाले आणि वर्तमान समयाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज तितक्याच तन्मयतेने आणि समर्थपणे हे कार्य पुढे घेऊन जात आहेत. 

       मुंबई महानगरातील विविध मैदानांवर सतत ५२ वर्षे हे संत समागम होत आले होते. मात्र, मागील वर्षी महाराष्ट्राचा ५३वा समागम पहिल्यांदाच मुंबईपासून दूर नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला.  

      या वर्षी समागमाचा मुख्य विषय स्थिरता ठेवण्यात आला आहे. प्रकृती परिवर्तनशील असून तिच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल घडत असतात. केवळ एक परमसत्य परमात्माच स्थिर आहे. ज्या मानवाचे नाते या एकरस राहणाऱ्या सत्तेशी जोडले जाते त्याच्या जीवनात स्थिरता येते आणि सर्व परिस्थितिमध्ये एकरस राहण्याची शक्ति त्याला प्राप्त होते. महाराष्ट्राच्या या समागमाच्या माध्यमातूनदेखील हाच पावन संदेश व्हर्च्युअल रूपात जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयास केला जाणार आहे.  

      संत निरंकारी मिशन समाज सेवेच्या कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. कोविड-१९च्या वैश्विक संकटाच्या दरम्यान संत निरंकारी मिशनमार्फत सरकारकडून देण्यात आलेल्या दिशा-निर्देशानुसार सोशल डिस्टंसिंग(दो गजाचे अंतरमास्क घालणे जरुर) इ.चे पालन करत जनसामान्यांच्या भल्यासाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबविले गेले. त्यामध्ये मुख्यत्वेकरुन संत निरंकारी मंडळाने मुंबईत सुरु केलेल्या संत निरंकारी ब्लड बँकेने महत्वपूर्णभूमिका पार पाडली असून हजारोंच्या संख्येने गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करुन त्यांचे जीवन वाचविण्याचे कार्य केले आहे. या सेवा अव्याहतपणे चालू आहेत. 

      मागील काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या या संत समागमाने आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केले आहे. यामध्ये देश-विदेशातील निरंकारी भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत आले आहेत. यावर्षी हा समागम जरी व्हर्च्युअल रूपात साजरा केला जात असला तरीही त्याची जगभर मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web