मुख्यमंत्री यांनी केली ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या कामांची पाहणी

मुंबई प्रतिनिधी – ट्रान्सहार्बर लिंक (मुंबई पारबंदर प्रकल्प) प्रकल्पांच्या कामांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए.राजीव आदी उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे प्रकल्पाच्या सद्यस्थितीच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले.मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच नवी मुंबईतील प्रदेशाचा विकास करण्याच्या दृष्टीने मुंबई पारबंदर प्रकल्पाचा प्रस्ताव सुमारे ३० वर्षापूर्वीपासून विचाराधीन होता. मुंबई व नवी मुंबई यामधील वाहतूक वेगवान व्हावी या हेतूने मुंबई बेटावरील शिवडी ते मुख्य भूमी (नवी मुंबई) वरील न्हावा या दरम्यान पूल बांधण्याचा विचार करण्यात आला होता. शासनाने दि. ४ फेब्रुवारी २००९ च्या शासन निर्णयान्वये या प्रकल्पाची मालकी व अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे असेल असे आदेशित केले. त्याचप्रमाणे या प्रकल्पाकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे निधी उपलब्ध करण्यात येईल, असेही आदेशित करण्यात आले. मुंबई पारबंदर प्रकल्प हा यापूर्वी रस्ते वाहतूक प्रकल्प म्हणून नियोजित होता. महाराष्ट्र शासनाने दि. ८ जून २०११ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे मुंबई पारबंदर प्रकल्पास प्रादेशिक विकास प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे

प्रकल्पात मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३ + ३ मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची (पोहोचमार्ग – approaches) लांबीचा ५.५ किमी इतकी आहे या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व नवी मुंबईतील शिवाजीनगर, राज्य मार्ग – ५४ व राष्ट्रीय महामार्ग ४ ब वर चिले गावाजवळ आंतरबदल (Interehanges) आहेत.सदर प्रकल्पामुळे नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा विकास होणार असून त्यामुळे मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. मुंबई व नवी मुंबई आणि कोकण यामधील अंतर कमी झाल्यामुळे इंधन व वाहतूक खर्चात बचत होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई पारबंदर प्रकल्पाची अंमलबजावणी जायका (JICA – Japan International Cooperation Agency) या जपानी शासन पुरस्कृत संस्थेकडून कर्ज प्राप्त करून करण्यात येत आहे. जायकाने सदर प्रकल्पाकरिता कर्ज देण्याबाबत व्यवहार्यता तपासण्याकरिता सल्लागार नियुक्त करून प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये तांत्रिक बाबींसोबतच प्रकल्पाचा पर्यावरणावर व सामाजिक जीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. सदर प्राथमिक सर्वेक्षणाबाबतचा अंतिम अहवाल ऑगस्ट 2016 मध्ये प्राप्त झाला आहे. जायकाने सदर प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत रु. 17,843 कोटी इतकी निश्चित केली आहे. या किंमतीमध्ये बांधकामाची किंमत, महागाई, आकस्मिक बाबींवरील खर्च, भूसंपादन, प्रशासकीय खर्च, बांधकामाच्या कालावधीतील व्याज इ. बाबींचा समावेश आहे. जायकासोबत दि. 31 मार्च 2017 आणि दि. 27 मार्च, 2020 रोजी कर्जाबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सदर प्रकल्पाकरिता एइकॉम एशिया कंपनी लि.- पडेको कंपनी लि. दार-अल-हंदाश टी.वाय.लिन इंटरनॅशनल (कन्सॉशिअम) यांची डिसेंबर २०१६ मध्ये सल्लागार म्हणून नेमणूक केली.

प्रकल्पाचे बांधकाम हे 3 स्थापत्य कंत्राटांद्वारे व 1 इंटेलीजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम कंत्राटाद्वारे करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पॅकेज-1 करिता लार्सन अँड टुब्रो लि., आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम कं. लि. कंसोशिअम यांची पॅकेज-2 करिता देवू इंजिनिअरींग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लि., टाटा प्रोजेक्ट्स लि., जेव्ही यांची आणि पॅकेज-3 करिता लार्सन अँड टुब्रो लि. यांची कंत्राटदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर कंत्राटदारांना दि. 23 मार्च, 2018 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. प्रत्यक्ष कार्यस्थळावर प्रकल्पाच्या पाईल, पाईल कॅप, पुलाचे खांबाचे बांधकाम सुरु आहे. तसेच पुलाचे सेगमेंट बनविण्याचे काम कास्टींग यार्डमध्ये सुरु केले व पुलाच्या गाळ्याचे सेगमेंट उभारणीचे काम अणि तात्पुरत्या पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पाची अर्थिक प्रगती सुमारे 42% इतकी झाली आहे. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी सुमारे साडेचार वर्षे आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web