वडघर ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सुषमा पाटील तर उपसरपंचपदी नंदकुमार पाटील बिनविरोध

भिवंडी प्रतिनिधी- तालुक्यातील २८ ग्राम पंचायतींच्या सरपंच उपसरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये बहुचर्चित असलेल्या वडघर ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सुषमा जालिंद्रनाथ पाटील यांचा बहुमताने विजयी झाला आहे. तर उपसरपंचपदी नंदकुमार भालचंद्र पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.
अवघ्या सात सदस्य संख्या असतांनाही वडघर ग्रामपंचायत निवडणूक तालुक्यात चर्चेला आली होती. या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पद उपभोगलेल्या उमेदवारांना राजकारणातील नवख्या उमेदवारांनी बहुमताने पराभूत केल्याने वडघर ग्राम पंचायत तालुक्यात चर्चेला आली होती. बुधवारी ग्राम पंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहा कृषी पर्यवेक्षक अधिकारी के एल शिगवण यांच्या उपस्थितीत सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सुषमा जालिंद्रनाथ पाटील यांना पाच मते तर सरिता अरुण पाटील यांना अवघी दोन मते पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शिगवण यांनी सुषमा पाटील यांची वडघर ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी निवड जाहीर केली. सुषमा पाटील यांची सरपंच पदी निवड जाहीर होताच त्यांच्या सार्थकांनी फटाके फोडून व गुलाल उधळत एकच जल्लोष केला व गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली होती.
दरम्यान गावकऱ्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे त्या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नाही तसेच गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच सुषमा पाटील यांनी दिली आहे. तर गावकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आज गावात ग्रामपंचायतीत परिवर्तन झाला असून गावाच्या विकासासाठी हे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्य एकत्रित प्रयत्न करून गाव विकास साधतील अशी आम्हाला अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया वडघरचे माजी सरपंच तुळशीराम पाटील यांनी दिली आहे.
यावेळी ग्राम पंचायत वडघर मध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य गुरुनाथ जाधव व सदस्या पौर्णिमा जितेंद्र पाटील , भाग्यश्री जयेंद्र पाटील यांचादेखील ग्रामस्थांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गावातील जैष्ठ नागरिक , महिला , व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web