बनावट सोने देऊन फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,मोहोळ पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेडया

सोलापूर प्रतिनिधी– बनावट सोन्याच्या चैन तयार करून त्याला हॉलमार्क मारून महाराष्ट्र मध्ये विविध बँका, पतसंस्था व सोनारांना सोने गहाण ठेवून मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाऱ्या टोळी चा पडदा फास करण्यात पोलिसांना यश आले असून दिल्लीतून दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. गौरव संजय अग्रवाल (वय,३१), अंकुर अशोक गोयल (वय,२५) रा. हापूड, उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावळेश्वर येथील गंगा ज्वेलर्सचे मालक मारुती रेवणकर यांना गावातीलच दोघाजणांनी बनावट सोन्याच्या साखळ्या देऊन ६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात २६ जानेवारी रोजी इस्माईल इन्नुस मणियार याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने टोळीचा प्रमुख सूत्रधार आटपाडी तालुक्यातील पिसेवाडीचा मनोज मधुकर बनगर सह माढा तालुक्यातील भुताष्टे येथून बळी आबा जाधव, दिल्लीच्या एजंटशी संपर्क असणाऱ्या योगेश श्रीगुरेलाल शर्मा, एजंट म्हणून काम करणाऱ्या करगणी (ता. आटपाडी) येथील नवनाथ किसन सरगर या पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती.

या बनावट साखळ्यावर होलमार्क लावून फसवणूक करणाऱ्या एजंटचे धागेदोरे पोलिसांना दिल्ली येथे असल्याचे तपासात निदर्शनास आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, पो. कॉ. प्रवीण साठे, पो. कॉ. शरद डावरे यांचे पथक दिल्लीला दि.२ फेब्रुवारी रोजी रवाना झाले होते. पथक दिल्लीत आल्याची कुणकुण लागताच उत्तर प्रदेश मध्ये हापुड या गावामध्ये या सोनसाखळी यांना हॉल मार्क लावणारा गौरव संजय अग्रवाल (वय,३१) रा. हापूड, उत्तर प्रदेश याने दिल्लीतून धूम ठोकत मेरठ गाठले होते. परंतु पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता दिल्लीच्या चांदणी चौकातून साईनाथ कुरियर च्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सांगली, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई या पाच जिल्ह्यात कुरियर च्या माध्यमातून सोनसाखळ्या पाठवणारा अंकुर अशोक गोयल (वय,२५) रा. हापूड, उत्तर प्रदेश या दोघांना ताब्यात घेऊन मोहोळ पोलिस स्टेशनला आणले आहे. 

याबाबत अधिक माहिती घेतली असता गौरव संजय अग्रवाल हा सोन्याच्या ओरिजनल हॉल मार्क असणाऱ्या केवळ कड्या मागवायचा व सोन्याच्या साखळी चा मुलामा असणाऱ्या बनावट साखळ्या त्या हॉलमार्क च्या कडी ला जोडून अशा बनावट साखळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक एजंटांमार्फत कुरिअर द्वारे पाठवून बँका, पतसंस्था व सोनारांची फसवणूक करण्याचा हा गोरखधंदा अखेर उघडकीस पोलिसांच्या तपासात आला आहे.

या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांच्याकडून या प्रकरणाबद्दल अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web