उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय शुक्रवारी सोलापूर विद्यापीठात

सोलापूर – राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ सोलापूर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी शुक्रवार, दि. 12 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

मंत्री श्री उदय सामंत यांच्यासह उच्च शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्या सोडवणार आहेत. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून सर्व संबंधित घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर मुख्यपृष्ठावर ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ सोलापूर’ ही विशेष लिंक तयार करण्यात आली आहे. येथे नागरिकांना इंग्रजी अथवा मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार आहेत. ही लिंक मंगळवार, दि. 9 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. येथे निवेदनाची सॉफ्ट कॉपी जोडण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांना आपली निवेदने दिनांक 11 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. ज्यांना ऑनलाईन निवेदन सादर करणे शक्य होणार नाही, त्यांनाही प्रत्यक्ष उपस्थित राहून मंत्री श्री उदय सामंत यांना आपले निवेदन देता येणार असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विकास घुटे यांनी दिली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web