आम्ही सावित्रीच्या लेकी या ग्रंथाचे उत्साहात प्रकाशन

सोलापूर : प्रतिनिधी
महिलांचा विकास झाला तरच समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होतो. महिला ह्या जन्मत:च सबला आहेत. मात्र, आजही महिलांचे वेगवेगळ्या माध्यमांतून खच्चीकरण होताना दिसते. हे थांबायला हवे. महिलांच्या विकासात समाजाचीही भूमिका महत्त्वाची असून समाजाकडून याअनुषंगाने कृती झाली तर महिलांचा सर्वांगिण विकास व्हायला वेळ लागणार नाही, असा विश्वास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला.
थिंक टँक पब्लिकेशन्स प्रकाशित व सुनिता अरुण गायकवाड संपादित “आम्ही सावित्रीच्या लेकी” या ग्रंथाचे प्रकाशन कुलगुरु डॉ. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून वालचंद महाविद्यालयातील समाजकार्य विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा वाघमारे उपस्थित होत्या. प्रास्ताविक संपादिका सुनिता गायकवाड यांनी केले. डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी पुस्तक निर्मितीमागील भूमिका विशद केली.
पुढे बोलताना कुलगुरु डॉ. फडणवीस म्हणाल्या की, आम्ही विद्यापीठाच्या माध्यमातून महिलांच्या विकासाबाबत, प्रबोधनाबाबत सातत्याने कार्य करीत असतो. “आम्ही सावित्रीच्या लेकी” या ग्रंथाचे एेतिहासिक संदर्भमूल्य मोठे आहे. महिलांची जडणघडण खूप कष्टदायी असते. त्यांची संघर्षमय वाटचाल ग्रंथ स्वरुपात प्रसिद्ध होणे महत्त्वाचे असते. ते कार्य या ग्रंथातून झाले आहे. महिलांचे हे अनुभव बँक डिपॉझिटसारखे असतात. हे अनुभव पुढे येण्याचे प्रमाण सतत वाढत व जमा होत राहिले पाहिजे. लेखनातून महिलांना बळ मिळत राहते. याकामी स्वयंप्रेरणा कामी येईल. महिलांचा सर्वांगिण व्हावा, ही भूमिका वाढीस लागली पाहिजे.
प्रमुख पाहुण्या निशा वाघमारे म्हणाल्या की, महिला या निसर्गत:च कणखर असतात. कोणतीही गोष्ट करताना महिला कुटुंबाचा, समाजाचा विचार करतात. त्यामुळेच त्या मानसिकदृष्ट्या सक्षम आणि बलशाली ठरतात. महिलांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षमय वाटचालीचे कथन ग्रंथरुपाने करायला हवे.
सूत्रसंचालन प्रा. अंजना गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. वनिता चंदनशिवे यांनी करुन दिला तर आभार शारदा गजभिये यांनी मांडले. यावेळी या ग्रंथातील सहभागी लेखिका सुशीला वनसाळे, प्रा. अंजना गायकवाड, सुनिता गायकवाड, शारदा गजभिये, प्रेमलता कांबळे, डॉ. वनिता चंदनशिवे, प्रमिला उबाळे, जयश्री रणदिवे, शीला हावळे, नीना गायकवाड, वत्सला गोगी, सुलभा जगझाप, मायादेवी गायकवाड, शशिकला बाबर, फुलावती काटे या महिलांची मनोगते झाली.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
थिंक टॅंक पब्लिकेशन्सच्या प्रकाशिका रसिका भंडारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web