राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बहुउद्देशीय कल्याण केंद्राचे भूमिपूजन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पस्तिसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वांद्रे (पूर्व) येथे बहुउद्देशीय कल्याण केंद्राचा भूमिपूजन कार्यक्रम आज राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. राज्यभरातून शासकीय कामकाजासाठी मुंबईत येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विश्राम आणि निवासाची सोय व्हावी याकरिता महासंघाच्या आठ मजली बहुउद्देशीय अशा कल्याण कें द्राची उभारणी येथे होत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कर्मचाऱ्यांचे जेष्ठ नेते दिवंगत र. ग. कर्णिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकजुटीने आणि संयमाने कार्य करून कोविड आपद्ग्रस्त स्थिती नियंत्रणात आणली, असे कौतुकोद्गार मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. एकूण ७० विभागांच्या संघटनांना एकत्रित ठेवत तब्बल ३५ वर्षे सातत्यपूर्ण यशस्वी संघटनात्मक वाटचाल करणाऱ्या अधिकारी महासंघाच्या सर्व विधायक कार्यांना शुभेच्छा देत त्यांनी पाठिंबा दर्शविला.

प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या अभ्यासपूर्ण योगदानामुळे राज्य शासनाची वाटचाल सुयोग्य दिशेनेच राहिली आहे. त्यामुळे प्रशासक हे नेहमी मार्गदर्शक राहिले आहेत, असे मंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. नियोजित कल्याण केंद्र राज्याच्या प्रशासनाचे प्रेरणास्त्रोत ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करून अधिकाऱ्यांच्या महत्वाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निश्चितपणे पुढाकार घेऊ, असे ते म्हणाले.

याप्रसंगी महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी मुंबईबाहेरून शासकीय तसेच संघटनात्मक कामकाजासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निवासासाठी शासनाने दिलेल्या भूखंडावर कल्याण केंद्राची उभारणी होत असून त्याच्या समय मर्यादेत उभारणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महासंघाचे सरचिटणीस विनायक लहाडे, सोनाली कदम, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी संकपाळ यांनी तर आभार प्रदर्शन खजिनदार नितीन काळे यांनी केले.

कार्यक्रमास नगरसेविका रोहिणी कांबळे, जेष्ठ वास्तुविशारद शशी प्रभू, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंघे यांच्यासह राज्यभरातून महासंघाचे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web