कल्याणात पार पडला अनोखा ‘कोवीड योद्धा’ कृतज्ञता सन्मान सोहळा

प्रतिनिधी.

कल्याण – कोरोना काळात समोर आलेल्या समाजातील नकारात्मक चेहऱ्यांबरोबर असे अनेक अनोळखी चेहरे होते, ज्यांनी आपल्या जीवाची पर्वाही न करता आपण सुरक्षित राहावे म्हणून कोरोनाशी दोन हात केले. या व्यक्तींनी दिलेल्या योगदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कल्याणातील मिलिंद चव्हाण विचार मंच आणि चव्हाण प्रतिष्ठानतर्फे अनोखा सन्मान सोहळा आयोजित केला होता. ज्यामध्ये कोरोनाशी थेट लढलेल्या डॉक्टर, आरोग्यसेवक, पोलीस, सामाजिक संस्था आदींना कोवीड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या लॉकडाऊननंतर अनेकांची आयुष्य कायमस्वरूपी बदलून गेली. तर याच काळात रक्ताच्या नात्यांतील आपलेपणाचे मुखवटेही आपसूक गळून पडले. मात्र अशा कठीण प्रसंगात आणि अडचणीच्या वेळी कोवीड योद्ध्यांचे हेच अनोळखी चेहरे आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. समाजातील एक घटक म्हणून अशा व्यक्तींच्या कार्याची जाणीव ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी असून त्यातूनच हा ‘कोवीडयोद्धा कृतज्ञता सोहळा’ आयोजित केल्याची माहिती आयोजक मिलिंद चव्हाण यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमात कोवीड काळात कोरोनाशी दोन हात केल्याबद्दल कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण, डॉक्टर पंकज उपाध्याय, डॉ. महेश जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी, शासकीय अधिकारी, आरोग्यसेवक, सफाई कर्मचारी, सामाजिक संस्था- मंडळं आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आनंदी जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबा जोशी, शिवसेनेचे जयवंत भोईर, चव्हाण प्रतिष्ठानचे साहेबराव चव्हाण, सुनील चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कृतज्ञता सोहळा आयोजित केल्याबद्दल हे सर्व कोवीड योद्धे अत्यंत भावुक झाल्याचे दिसून आले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web