राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्‌घाटन

प्रतिनिधी.

मुंबई – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन आज वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

1995 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या उत्तर सरहद्दीवरील कुपवाडा येथे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी शहीद झालेले कॅप्टन विनायक विष्णू गोरे यांच्या त्या मातोश्री आहेत. श्रीमती गोरे यांनी आपला मुलगा शहीद झाल्यानंतर राज्यातील शाळाशाळांमध्ये जाऊन देशाच्या संरक्षणासाठी युवा पिढीने पुढे आले पाहिजे म्हणून व्याख्यानाद्वारे युवकांचे प्रबोधन केले. श्रीमती गोरे यांची तब्बल 8 पुस्तके आणि विविध वर्तमानपत्रात जनजागृती करणारे लेख प्रसिद्ध आहेत. माहे जानेवारी, 2017 मध्ये बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. श्रीमती गोरे या पार्ले टिळक विद्यालयातून मुख्याध्यापिका पदावरुन सेवानिवृत्त झाल्या आहेत.

आपल्या कार्यालयाचे उद्‌घाटन वीरमातेच्या हस्ते व्हावे, अशी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची इच्छा होती आणि श्रीमती गोरे यांना उद्‌घाटनाचा सन्मान देऊन अत्यंत आदराने आज मंत्रालयातील दालन क्र.331, दुसरा मजला येथील कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आमदार राजकुमार पटेल, बल्लूभाऊ जवंजाळ तसेच मंत्रालयातील अधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web