कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवला सॅटेलाईट

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या 10 विद्यार्थ्यांनी सॅटेलाईट बनवल्याची किमया करत कल्याण डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडियातर्फे आयोजित ‘स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज 2021’मध्ये केडीएमसीचे हे 10 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांमध्ये स्पेस टेक्नॉलॉजीची आवड आणि जिज्ञासा निर्माण होण्याच्या उद्देशाने ए.पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशनतर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत एकाच वेळी तब्बल 25 ग्रॅम ते 80 ग्रॅम वजनाचे 100 पेलोड उपग्रह हेलियम बलूनच्या माध्यमातून एकाचवेळी अवकाशात सोडले जाणार असून हा एकप्रकारे जागतिक विक्रम असल्याची माहिती या उपक्रमाचे समन्वयक आणि केडीएमसीचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरकटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
या जागतिक पातळीच्या विक्रमात सहभागी होण्यासाठी केडीएमसीच्या या 10 विद्यार्थ्यांना डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी यांनी मार्टीन ग्रुपमार्फत दत्तक घेत सहभागी करून घेतले. यामध्ये केडीएमसीच्या विविध शाळांमधून पंढरीनाथ शेळके (8वी), प्रथमेश घावट (7वी), बुशरा परवीन आलम (8वी), कशीश शेख (7वी), माणिक राठोड (8वी), सुजल गोठणकर (8वी), गौतम इंगोले (7वी), अफरोज शेख (7वी), दिप कडव (7वी) आणि नवाज शेख (6वी) या 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या सर्व मुलाना मराठीतून पेलोड क्यूब उपग्रह म्हणजे काय? त्यांचे कार्य काय? ते कसे चालतात? हेलियम बलून म्हणजे काय? आदींबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
येत्या 7 फेब्रुवारीला रामेश्वरम येथे हेलियम बलूनच्या माध्यमातून 35 ते 38 हजार मीटर उंचीवर सोडण्यात हे 100 छोटे उपग्रह सोडण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून ओझोनचा थर, कार्बनडाय ऑक्सईड, हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आदी गोष्टींची माहिती गोळा केली जाणार असून काही उपग्रहांमधून झाडांच्या बियाही अवकाशात पाठवण्यात येणार असल्याचे सरकटे यांनी सांगितले.
एवढ्या मोठ्या जागतिक पातळीवरील अनोख्या अशा उपक्रमात पहिल्यांदाच केडीएमसीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. हा कल्याण डोंबिवलीकरांसाठी नक्कीच एक अभिमानास्पद असा क्षण आहे. त्याबद्दल केडीएमसी शिक्षण विभाग आणि या विद्यार्थ्यांचे करावे तितके कौतुक कमीच होईल. तर या उपक्रमात मिळालेला अनुभव म्हणजे भविष्यातील त्यांच्या करिअरच्या जडण-घडणीत नक्कीच महत्वाची भूमिका बजावेल यामध्ये कोणतीही शंका नाही.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web