भिवंडीत गोदाम इमारत कोसळून एकाचा मृत्यू तर सहा जखमी

प्रतिनिधी.

भिवंडी –भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतांनाच दापोडा ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कंपाउंड येथे तळ अधिक एक मजली गोदाम इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत एका सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. तर ढिगाऱ्याखाली अजूनही चार ते पाच जण अडकल्याची शक्यता आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवांनासह, भिवंडी व ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे अग्निशमन केंद्र तसेच  ठाणे आपत्ती प्रतिसाथ पथक त्याच बरोबर एनडीआरएफ पथक दाखल झाले आहे.                  

दापोडा ग्राम पंचायतीच्या हद्दीत असलेल्या हरिहर कंपाउंड येथे गोदाम संकुल आहे. या गोदामात तळ मजल्यावर शॅडोफॅक्स ऑनलाईन पार्सल कंपनी असून या कंपनीत ऑनलाईन साहित्य पार्सल करण्यात येत होते. सुमारे ७० हुन अधिक कामगार या कंपनीत कामाला असल्याची माहिती मिळत असून सोमवारी दुर्घटना झाल्यावेळी या कंपनीत सुमारे ५० ते ५५ कामगार उपस्थित होते. तर पहिल्या मजल्यावर मार्क इम्पेक्स हि टीव्ही व इलेक्टरोनिक साहित्याची कंपनी होती ज्यात सहा ते सात कामगार काम करीत होते, टीव्ही कंपनीतील हे सर्व कामगार सुरक्षीत असल्याची माहिती मिळत आहे. तर गोदामाच्या दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम देखील सुरु होते , सुदैवाने हे मजूर देखील या दुर्घटनेत वाचले असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे तळ मजल्यावर काम सुरु असताना अचानक गोदामाची इमारत कोसळली व परिसरात व कंपनीत एकच गोंधळ उडाला . यावेळी २५ ते ३० कामगार धावत बाहेर पळाले , यावेळी या कंपनीत सिक्युरिटी काम करत असलेल्या सौरभ त्रिपठी ( वय ३० अंदाजे ) या कामगाराने सुमारे २० ते २५ लोकांना बाहेर काढले, व इतर अडकलेल्या कामगारांना बाहेर काढत असतांना सिक्युरिटी कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत सुनील कुमरा , कल्पना पाटील , रोशन पागी , अक्षय केनी , शैलेश तरे , व इतर एक असे सहा जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी स्व इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात व ठाणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अजूनही चार ते पाच जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून इमारत पूर्णतः कोसळली असल्याने कामगारांना वाचविण्यासाठी बचाव पथका कडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.या दुर्घनेत कामगारांनी पार्क करून ठेवलेल्या दुचाकींसह माल भरणे व उतरण्यासाठी गोदामाला लागलेल्या कंटेनरवर इमारतीचा काही भाग कोसळल्याने या वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले असून या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web