वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर उर्ज्यामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक

प्रतिनिधी.

मुंबई – वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते त्वरित सोडविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तिन्ही वीज कंपनीच्या व्यवस्थापनास दिले.

इंटक संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर डॉ. राऊत यांच्या उपस्थितीत वीज कंपनीच्या फोर्ट, मुंबई स्थित कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

व्याधी अथवा अपघातामुळे शारीरिकदृष्ट्या अक्षम झालेल्यांना स्वेच्छानिवृत्ती, रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा ग्राह्य धरणे, वीज बिल वसुलीसाठी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेणे, अभियांत्रिकी पदवी व पदविकाधारक तांत्रिक कर्मचाऱ्यांना कनिष्ठ व सहायक अभियंता या पदावर प्रतिनियुक्ती मिळण्याबाबत, निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत, रिक्त पदे भरणे आदी मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. डॉ. राऊत यांनी इंटकद्वारे उपस्थित केलेले प्रश्न तपासून निर्णय घेण्याचे निर्देश व्यवस्थापनाला दिले.

गृहमंत्र्यांसोबत बैठक घेणार

स्थानिक दबावात वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे किंवा महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा होण्याबाबत गृहमंत्री तसेच विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले.

उच्च अर्हता धारण करणाऱ्यांना वरिष्ठ पदावर प्रतिनियुक्तीसाठी 15 वर्षाची अट शिथिल करण्याच्या मागणीवरही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असीम गुप्ता, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) भालचंद्र खंडाईत, इंटकचे अध्यक्ष व आमदार जयप्रकाश छाजेड व इतर कामगार नेते उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web