अर्थाच्या अवती-भवती या ई-पुस्तकाचे प्रकाशन

प्रतिनिधी.

सोलापूर – अर्थशास्त्र आणि सर्वसामान्य जनतेतील हे सहसंबंध अधिक ताकदीने, सोप्या भाषेत मांडण्याचे कार्य कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी “अर्थाच्या अवती-भवती” या ग्रंथात केले आहे. अर्थशास्त्रातील हे महत्त्वाचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत, अशी अपेक्षा परिसर शास्त्रज्ञ तथा पद्मभूषण माधवराव गाडगीळ यांनी व्यक्त केली.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस लिखित व थिंक टँक पब्लिकेशन्स प्रकाशित “अर्थाच्या अवती-भवती” या ई-बुकचे ऑनलाईन प्रकाशन तसेच विकिमिडिया प्रकल्पात वाचकार्पण करण्याचा सोहळा रविवार दिनांक 24 जानेवारी 202 1 सकाळी ऑनलाईन स्वरुपात पार पडला. परिसर शास्त्रज्ञ तथा पद्मभूषण माधवराव गाडगीळ यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातर्फे करण्यात आले होते. यावेळी या ग्रंथाच्या लेखिका कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, सेंटर फॉर इंटरनेट अ‍ॅण्ड सोसायटीचे समन्वयक सुबोध कुलकर्णी, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक व कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. डॉ. गौतम कांबळे, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर उपस्थित होते. प्रारंभी डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी प्रास्ताविक केले तर अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुुरु प्रा.डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कला व ललित कला संकुलाच्या संचालिका डॉ. माया पाटील, भाषा संकुलाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते. मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

प्रमुख अतिथी माधवराव गाडगीळ पुढे म्हणाले कीअर्थशास्त्र हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अर्थशास्त्राचा कोणत्या ना कोणत्या रुपाने लोकांशी नेहमी संबंध येतोच. मात्र विकासाच्या नावाखाली इंग्रजी भाषेची सक्ती करणे चुकीचे आहे. केवळ इंग्रजी विषयात उत्तीर्ण न झाल्याने गडचिरोली आणि इतर आदिवासी भागातील विद्यार्थी विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत.अनेक शैक्षणिक संस्थांत केवळ इंग्रजीची सक्ती केल्याचे दिसते. इंग्रजी भाषेचा व देशाच्या विकासाचा तसा काहीच संबंध नसतो. मी दक्षिण कोरियात गेलो असता तेथे मला वेगळे अनुभव आले. दक्षिण कोरियातील लोकांना इंग्रजी भाषा नीटपणे येत नाही. ते तेथील स्थानिक भाषेत रोजचा व्यवहार करतात. तरीही त्या देशाचा आर्थिक विकास झाल्याचे दिसते. कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी त्यांच्या अर्थाच्या अवती-भवती या पुस्तकात विविधांगाने मांडणी केली आहे. ही मांडणी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचेही पद्मभूषण गाडगीळ म्हणाले .

सेंटर फॉर इंटरनेट अ‍ॅण्ड सोसायटीचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी विकिमिडिया प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, विकिमिडिया हा खुल्या ज्ञानस्त्रोताचा जागतिक मंच आहे. याद्वारे विकिपिडियाचा, विकिस्त्रोत इत्यादी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जातात. मराठी भाषा समृद्धीसाठी या ज्ञानस्रोतात मराठी भाषेतील नामवंत लेखकांची पुस्तके ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहेत. कोणतीही तांत्रिक किंवा स्वामित्वाची बंधने नसलेला हा मुक्त ज्ञानस्त्रोत आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी प्रकाशना दिवशीच त्यांचे पुस्तक या खुल्या ज्ञानस्रोतावर उपलब्ध करुन दिले ही महत्त्वाची बाब आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील हे पहिले उदाहरण आहे. इतर साहित्यिक, अभ्यासकांनीही मुक्त ज्ञानस्रोतात त्यांचे ग्रंथ वाचकार्पण करून मराठी भाषा समृद्धीसाठी योगदान द्यावे .

या पुस्तकाच्या लेखिका कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, “अर्थाच्या अवती-भवती” हे ई-बुक वाचकांच्या हाती देताना मला आनंद होत आहे. या पुस्तकाची तीन भागात विभागणी आहे. अर्थव्यवस्थेची परिस्थिती, बजेट, जागतिकीकरण, भांडवलवाद, देशातील विविध समस्या, विदर्भाच्या विकासाचा मुद्दा, जलसिंचन नियोजन आदी विषयांवर या पुस्तकात सविस्तर मांडणी केली आहे. भारताची बदलती परिस्थिती जरी आता वेगळी असली तरी, काही पूर्वीच्या घडामोडी यात समाविष्ट आहेत. पूर्वीच्या बाबींचा विचार किंवा कृषी, अर्थसंकल्प त्याचे स्वरूप समजावून घेण्यासाठी आधीची पार्श्‍वभूमी महत्त्वाची आहे. ती या ग्रंथात मांडली आहे. देशाच्या प्रगतीसाठी जे प्रयत्न झाले त्यातून तळागाळातील लोकांच्या व मध्यमवर्गीयांच्या समस्या सुटायला हव्या होत्या. मात्र, त्या सुटल्या नाहीत. जागतिकीकरण व बदलत्या भांडवल बाजारामुळे संरचनात्मक बदल घडायला लागले आहेत. त्याचा परिणाम उद्योग-व्यापार, कृषी क्षेत्र इत्यादीवर होताना दिसतो. या ग्रंथात देशातील पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती याचा आढावा घेण्यात आला आहे. सामाजिक शास्त्रे संकुलातील माझ्या सर्व सहकार्‍यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक या ग्रंथाची निर्मिती केली आहे. विकिपिडियाच्या लोकोपयोगी उपक्रमात आम्ही नेहमी सहभाग नोंदवू.

सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे म्हणाले की, अर्थशास्त्रातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांसोबतच इतर विषयातील विद्यार्थी व वाचकांनाही उपयुक्त ठरणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकात मध्यमवर्गासह तळागाळातील घटकांवर अत्यंत अभ्यासूपणे भाष्य करण्यात आले आहे. अर्थशास्त्राच्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.

यावेळी थिंक टँक प्रकाशन संस्थेतर्फे डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सहायक प्राध्यापिका ममता बोल्ली यांनी, तर आभारप्रदर्शन सहायक प्राध्यापिका तेजस्वीनी कांबळे यांनी केले. यावेळी विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे संचालक, पदाधिकारी, प्राध्यापक, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. झूम मिटिंगद्वारे हा कार्यक्रम झाला.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web